Join us

T-20: विश्वचषकासाठी संघ बांधणीचे लक्ष्य; रोहित शर्माच्या फलंदाजीची उत्सुकता 

टी-२० मालिका : भारताचा इंग्लंडविरुद्ध पहिला सामना आज, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाआधी भारताला १५ टी-२० सामने खेळायचे आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 11:07 IST

Open in App

साऊदम्पटन : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी अंतिम संघ बांधणी करण्याच्या निश्चयाने भारतालाइंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळावे लागणार आहे. कारण, आता प्रयोग करण्याची वेळ संपली आहे. कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने कसोटीस मुकलेला कर्णधार रोहित शर्मा बुधवारी येथे दाखल झाला. तो पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे.

विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत  हे दुसऱ्या सामन्यापासून संघात दाखल होतील. त्यांच्या अनुपस्थितीत  ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची अजून एक संधी असेल. दुखापतीमुळे ऋतुराज हा इशान किशनसोबत आयर्लंडविरुद्ध सलामीला खेळू शकला नव्हता. रोहितचे येथे पुनरागमन झाल्यास ऋतुराजला पुन्हा बाकावरच बसावे लागेल. किशनने मिळालेल्या संधीचेसोने केले. राखीव सलामीवीर म्हणून तो दावा भक्कम करू शकेल.

दुसऱ्या सामन्यात कोहली तिसऱ्या स्थानावर खेळू शकतो. अशा वेळी दीपक हुडा स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करू शकेल. पदार्पणाच्या प्रतीक्षेत असलेले राहुल त्रिपाठी व अर्शदीप सिंग यांचा दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात समावेश करण्यात आलेला नाही. पहिल्या टी-२० लढतीतही दोघांच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाआधी भारताला १५ टी-२० सामने खेळायचे आहेत.  या मालिकेतील तीन सामन्यांव्यतिरिक्त विंडीजविरुद्ध पाच, तसेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयोजित आशिया चषक स्पर्धेत पाच सामने होतील. सप्टेंबर महिन्यात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. इंग्लंड संघाला जोस बटलर हा नवा कर्णधार लाभला. तो इयोन मॉर्गनचे स्थान घेईल. बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो यांना मात्र विश्रांती देण्यात आली आहे. तरीही या संघात प्रतिस्पर्धी मारा बोथट ठरविणारे आक्रमक फलंदाज आहेत.  बटलर आणि लियॉम लिव्हिंगस्टोन आयपीएलमध्ये धावा काढण्यात आघाडीवर होते. भारताविरुद्ध ते आक्रमकता कायम राखतील, अशी यजमानांना अपेक्षा आहे.

 

टॅग्स :भारतइंग्लंड
Open in App