Join us

टी२० लढत : पहिल्या लढतीत भारताची यजमान न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात

श्रेयस अय्यर, लोकेश राहुलमुळे भारताची विजयी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 05:03 IST

Open in App

ऑकलंड - श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने शुक्रवारी पाच सामन्याच्या मालिकेतील पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा सहा गड्यांनी दणदणीत पराभव केला. विश्वचषकाच्या तयारीसाठी हा विजय उत्साहवर्धक ठरला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले २०४ धावांचे आव्हान भारताने ६ गडी राखून पूर्ण केले.लोकेश राहुलने ५६, तर विराट कोहलीने ४५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत नाबाद ५८ धावा कुटल्या. या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय टी२० च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघातील ५ खेळाडूंनी अर्धशतक झळकावले.भल्यामोठे आव्हान घेऊन उतरलेल्या भारताला दुसऱ्याच षटकात रोहित शर्माच्या (७) रुपाने मोठा धक्का बसला. यानंतर राहुल-कोहली यांनी दुसºया गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. राहुलने २७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांनी आपली खेळी सजवली. कोहलीने ३२ चेंडूंत ३ चौकार व एक षटकार ठोकला. दोघांनी रचलेल्या पायावर विजयी कळस चढवला तो श्रेयस अय्यरने. त्याने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढताना २९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५८ धावा फटकावल्या. मनिष पांड्येने (१४*) त्याला चांगली साथ दिली.तत्पूर्वी कॉलिन मुन्रो व कर्णधार केन विलियम्सन यांच्या आक्रमक अर्धशतकांमुळे न्यूझीलंडने ईडन पार्कच्या लहान सीमारेषेचा भरपूर लाभ घेत ५ बाद २०३ धावा उभारल्या. मात्र भारताने नियोजनबद्ध फटकेबाजी करत एक षटक शिल्लक राखून विजय मिळवला. मुन्रोने ४२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा, तर विलियम्सनने २६ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. अनुभवी रॉस टेलरने २७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५४ धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. त्याआधी हुकमी सलामीवीर मार्टिन गुप्टीलने चौफेर फटकेबाजी करताना १९ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३० धावा फटकावत यजमानांना वेगवान सुरुवात करुन दिली. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलकन्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद २०३ धावा (कॉलिन मुन्रो ५९, रॉस टेलर नाबाद ५४, केन विलियम्सन ५२; रवींद्र जडेजा १/१८, शिवम दुबे १/२४, जसप्रीत बुमराह १/३१, युझवेंद्र चहल १/३२,शार्दुल ठाकूर १/४४.) पराभूतवि. भारत : १९ षटकांत ४ बाद २०४ धावा (श्रेयस अय्यर नाबाद ५८, लोकेश राहुल ५६, विराट कोहली ४५; ईश सोढी २/३६, ब्रिक टिक्नर १/३४, मिचेल सँटनर १/५०.)पहिल्यांदाच एकाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाच फलंदाजांकडून अर्धशतकी खेळी.टी२०मध्ये भारताने सर्वाधिक चौथ्यांदा दोनशेहून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. यानंतर आॅस्टेÑलियाने दोनवेळा अशी कामगिरी केली आहे.भारताने टी२०मध्ये तिसºया क्रमांकाच्या सर्वाधिक धावांचे लक्ष्य पूर्ण केले. याआधी २०१९ साली विंडीजविरुद्ध २०८ आणि २००९ साली मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध २०७ धावांचे लक्ष्य भारताने पार केले होते.टी२०मध्ये ईश सोढीने भारताविरुद्ध सर्वाधिक १३ बळी घेताना पाकिस्तानच्या उमर गुलला (११) मागे टाकले.यष्टीरक्षणामुळे फलंदाजीसाठी फायदा झाला - राहुल

यष्टीरक्षणाबरोबरच फलंदाजीतही उत्तम कामगिरी करणे हे आव्हानात्मक आहे. मात्र भारताचा के.एल.राहुल या दुहेरी जबाबदारीचा आनंद घेत आहे. ‘यष्टीरक्षणामुळे फलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी होत आहे,’ असे मत राहुलने सामन्यानंतर व्यक्त केले. राहुलने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पंत दुखापतग्रस्त झाल्याने यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली. या मालिकेत त्याने यष्टीरक्षणासह फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली. राहुलकडेच या दोन्ही जबाबदारी असतील असे विराटनेही स्पष्ट केले आहे.राहुल म्हणाला,‘मला हे चांगलेच वाटत आहे. आंतरराष्टÑीय पातळीवर हे बहुतेकजण प्रथम पहात असतील, मात्र मी आयपीएलमध्ये गेली ३-४ वर्षांपासून हेच काम करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही मला संधी मिळेल तेव्हा यष्टीरक्षण करतो.’ तो पुढे म्हणाला, ‘मला यष्टीरक्षणाची आवड आहे. कारण यामुळे तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज येतो. यासंदर्भातील माहिती मी कर्णधार व गोलंदाजांना देतो. त्याचबरोबर फलंदाजीतही या माहितीचा फायदा होतो.’भारतीय फलंदाजांना दबावात आणले नाही - रॉस टेलरन्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने आपल्या गोलंदाजांवर टीका करताना, ‘आम्ही भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करु शकलो नाही,’ असे म्हटले. टेलर म्हणाला, ‘या मैदानावर आम्ही किमान १० ते १५ धावा अजून करायला हव्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत खूपच चांगला मारा केला. त्यामुळे आम्हाला धावा करण्याची संधी मिळाली नाही. आम्ही चांगली कामगिरी केली, मात्र भारतीय फलंदाजांनी त्याहून सरस कामगिरी केली. आमच्या गोलंदाजांना भारताविरुद्ध आणखी कामगिरी उंचावयाला हवी.टेलरने पुढे सांगितले की, ‘भारताविरुद्ध जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकायला हवेत. यामुळे धावगती वाढून फलंदाजांवर दडपण येते.’ टेलरने श्रेयस अय्यरचे कौतुक करत म्हटले की, ‘त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव नाही. तरीही दबावाखाली त्याने मोठे फटके मारून भारताला सहज विजय मिळवून दिला.’ 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहली