Syed Mushtaq Ali Trophy 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका.... अशा स्पर्धांतून नजरंदाज केल्या केलेल्या पृथ्वी शॉ याने ( Prithvi Shaw) आज निवड समितीला जबदरस्त चपराक दिली. दुखापतीतून सावरल्यानंतर पृथ्वीने रणजी करंडक, सय्यद मुश्ताक अली, विजय हजारे आदी स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. मात्र, ना त्याचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी विचार झाला, ना नुकत्याच पार पडलेल्या आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी. त्यानंतर पृथ्वीने सोशल मीडियावर अप्रत्यक्षितपणे आपली नाराजी व्यक्त केली, परंतु आज त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२ स्पर्धेत आसामविरुद्ध चौकार-षटकारांची आतषबाजी करताना ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले.
भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीने न्यूझीलंड अ विरुद्धच्या वन डे मालिकेतही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला आफ्रिकेविरुद्ध संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. त्यानंतर मुश्ताक अली ट्रॉफीत तो सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. मिझोरामविरुद्ध नाबाद ५५ धावा कुटणाऱ्या पृथ्वीने मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्याच षटकात ०, ४,४,४,४,४ असा धुरळा उडवला. आज आसामविरुद्ध त्याने पाचव्या षटकात ४,४,४,६,६,४ अशी धुलाई केली. अमन खान १५ धावा करून माघारी परतल्यानंतर पृथ्वी व यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"