Syed Mushtaq Ali Trophy 2025 Priyansh Arya VS Varun Chakaravarthy : IPL च्या आगामी हंगामासाठी होणाऱ्या मिनी लिलावाआधी भारतीय क्रिकेटपटू BCCI च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहेत. देशांतर्गत टी-२० क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धेतील दिल्ली विरुद्ध तमिळनाडू यांच्यातील सामन्यात प्रियांश आर्य आणि वरुण चक्रवर्ती हे दोन स्टार समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले.
शाहरुखच्या मिस्ट्री स्पिनरसमोर भारी ठरला प्रितीच्या संघातील पठ्या
आयपीएलमध्ये प्रिती झिंटाच्या सह मालकीच्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या संघाकडून हवा करणाऱ्या प्रियांश आर्य याने टीम इंडियाचा हुकमी एक्का आणि आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या संघाकडून खेळणाऱ्या मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. हे दोन्ही खेळाडू IPL मिनी लिलावाआधी रिटेन झालेल्या खेळाडूंच्या यादीत आहेत.
प्रियांशचा धमाका, २०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
दिल्लीच्या डावाची सुरुवात करताना प्रियांश आर्यनं १५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २३३.३३ च्या सरासरीनं ३५ धावा कुटल्या. या खेळीत त्याने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. फक्त आयपीएलमध्येच नव्हे आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वरुण चक्रवर्तीचा सामना करताना भल्याभल्या फलंदाजांना घाम फुटतो. पण अनकॅप्ड प्रियांश आर्य याने त्याच्या एका षटकात १९ धावा कुटत मैफिल लुटली.
वरुण चक्रवर्ती ठरला फिका, दिल्लीकडून प्रियांशसह यश धूल अन् आयुष बडोनीचा जलवा
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत वरुण चक्रवर्ती हा तमिळनाडू संघाचे नेतृत्व करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खास छाप सोडेल, अशी अपेक्षा होती. पण दिल्ली विरुद्धच्या सामन्यात तो चांगलाच महागडा ठरला. ४ षटकात त्याने ४७ धावा खर्च केल्या. यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. पहिल्यांदा फलंदाजी करताना तमिळनाडूच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद १९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रियांश आर्य याच्या तुफान फटकेबाजीशिवाय यश धूलनं ४६ चेंडूत केलेली ७१ धावांची खेळी आणि आयुष बडोनीच्या २३ चेंडूतील ४१ धावांच्या जोरावर दिल्लीनं हा सामना ६ गडी राखून जिंकला.