Syed Mushtaq Ali Trophy 2025 Prithvi Shaw Smashes Fifty : ऋतुराज गायकवाची टीम इंडियात एन्ट्री झाल्यावर महाराष्ट्र संघाचा कर्णधार झालेल्या पृथ्वी शॉनं आपल्या धडाकेबाज खेळीचा नजराणा पेश केला. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात स्फोटक खेळीसह त्याने महाराष्ट्र संघाला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला आहे. महाराष्ट्र संघाने जम्मू काश्मीर विरुद्धच्या लढतीनं या स्पर्धेची सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना केल्यावर आता दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र संघाने आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पृथ्वी-अर्शिन यांची शतकी भागीदारी
कोलकाता येथील जादवपुर युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ बाद १९१ धावा केल्या होत्या. पृथ्वी आणि या धावसंख्येचा पाठलाग करताना पृथ्वी शॉसह अर्शिन कुलकर्णी यांनी केलेल्या ११७ धावांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने ८ विकेट्स आणि ८ चेंडू राखून दमदार विजय नोंदवला.
पृथ्वीनं ९ चौकार अन् ३ उत्तुंग षटकारासह १८३ च्या स्ट्राइक रेटनं केल्या धावा
महाराष्ट्र संघाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या पृथ्वी शॉनं २३ चेंडूत अर्धशतक साजरे केले. या सामन्यात त्याने ३६ चेंडूत ९ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारासह १८३.३३ च्या सरासरीसह ६६ धावा काढल्या. दुसऱ्या बाजूला अर्शिन कुलकर्णधी ५४ चेंडूत १२ चौकारांसह २ षटकारांच्या मदतीने ८९ धावांवर नाबाद राहिला.
जम्मू काश्मीर विरुद्धच्या लढतीत फ्लॉप ठरलेला पृथ्वी
मुंबईचा संघ सोडून महाराष्ट्र संघाकडून नवी सुरुवात करताना पृथ्वी शॉनं रणजी सामन्यात धमाकेदार कामगिरी केली आहे. एका द्विशतकासह यंदाच्या रणजी हंगामात महाराष्ट्र संघाकडून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील सलामीच्या लढतीत तो अवघ्या ५ धावांव बाद झाला. संघालाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर कॅप्टनसह महाराष्ट्राचा संघही ट्रॅकवर आला असून पृथ्वी शॉकडे कामगिरीतील सातत्य दाखवत IPL चा दरवाजा ठोठावण्याची संधी आहे. गत हंगामातील मेगा लिलावात तो अनसोल्ड राहिला होता.