Join us  

टीम इंडियात निवड झालेल्या रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूचं वादळ; ५८ चेंडूत १३३ धावा कुटल्या!

suryakumar yadav: मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay Hazare Trophy)  तुफान खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 3:41 PM

Open in App

मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay Hazare Trophy)  तुफान खेळीचं प्रात्यक्षिक दाखवत भारतीय टी-२० संघात झालेली निवड सिद्ध करुन दाखवलीय. जयपूरमध्ये झालेल्या पद्दुचेरीविरोधातील सामन्यात सूर्यकुमार यादवनं वादळी शतकं ठोकलं. त्यानं ५८ चेंडूत ४ षटकार आणि २२ चौकारांच्या जोरावर तब्बल १३३ धावांची खेळी साकारली. (Suryakumar Yadav Scores 133 In 58 Balls Vijay Hazare Trophy)

विशेष म्हणजे दुसऱ्या बाजूला पृथ्वी शॉ धावांची बरसात करत होता. पृथ्वी शॉनं नाबाद २२७ धावा कुटल्या. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवच्या जबरदस्त फटकेबाजीच्या जोरावर मुंबईच्या संघानं ५० षटकांत ४ बाद ४५७ धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवनं तिसऱ्या विकेटसाठी १०३ चेंडूत २०१ धावांची भागीदारी रचली. 

सूर्यकुमारची भारतीय संघात निवडइंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सूर्यकुमारची निवड न झाल्यानं सोशल मीडियावर संघ निवडीवरुन बरीच चर्चा झाली होती. क्रिकेट वर्तुळातही निवड समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. अखेर आता इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमारचा समावेश करण्यात आला आहे. 

सूर्यकुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. त्यानं आपल्या तडफदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाला अनेक सामने देखील जिंकून दिले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा तो आवडता खेळाडू म्हणून ओळखला जातो. खुद्द रोहितनंही एकदा सूर्यकुमार आपला फेव्हरेट खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. 

सूर्यकुमारनं विजय हजारे करंडक स्पर्धेत आता शतकी खेळी साकारुन जणू भारतीय संघातील आपली निवड सार्थ ठरवून दाखवली आहे. आता इंग्लंड विरुद्धच्या टी-२० सामन्यांमध्ये अंतिम ११ जणांच्या संघात सूर्यकुमारला संधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सभारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयभारत