ICC T20 World Cup, 2026, Suryakumar Yadav Not Happy With One Aspect In India's Win Over Zimbabwe : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-झिम्बाब्वे यांच्यातील सुपर ८ फेरीतील सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात खेळवण्यात आला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीतील ताकद दाखवून देताना निर्धारित २० षटकात २५६ धावा ठोकल्या. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होती. झिम्बाब्वेला या धावसंख्येचा पाठलाग करणं जमलं नाही. पण ब्रायन बेनेटच्या नाबाद ९७ धावाच्या खेळीच्या जोरावर त्यांनी १८४ धावांपर्यंत मजल मारली. ही गोष्ट दमदार फलंदाजीनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजीतील मोठी उणीव दाखवून देणारी होती. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवनंही फलंदाजी बहरण्यामागची पडद्यामागची गोष्ट शेअर करताना गोलंदाजीतील उणीव मान्य केली. त्यामुळेच मॅच जिंकल्यावरही तो नाराज दिसला. सूर्यकुमार यादव नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'स्लाइड' पाहिली अन् सकारात्मकता मिळाली
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, आधी जे झालं ते विसरून पुढे जायचं आहे. अहमदाबादच्या मैदानात जे झालं त्याचा फार विचार केला नाही.आमच्या व्हिडिओ विश्लेषकाने सर्व फलंदाज आणि गोलंदाजांनी याआधी काय चांगले केले, यासंदर्भातील खास सादरीकरण (स्लाइड) तयार केले होते. हे पाहून सकारात्मकता मिळाली. फलंदाजीत प्रत्येकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले हे आनंददायी आहे.
IND vs ZM : "आम्ही सर्वजण..." मॅचचा हिरो ठरल्यावर हार्दिक पांड्याने शेअर केली ड्रेसिंगरुममधील 'ती' गोष्ट
गोलंदाजीबद्दल काय म्हणाला सूर्या?
फलंदाजांचे कौतुक केल्यावर सूर्यानं गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे, हे स्पष्ट सांगितले. तो म्हणाला की, "प्रामाणिकपणे सांगायचं तर, आम्ही गोलंदाजीत आणखी चांगलं करू शकलो असतो. पुढच्या सामन्यात याकडे लक्ष देऊ.” यावेळी सूर्यानं झिम्बाब्वेच्या फलंदाजांचेही कौतुक केले. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती, पण झिम्बाब्वेच्या फलंदाजांचे श्रेय कमी करता येणार नाही. त्यांनी पॉवरप्लेमध्ये वेळ घेतला आणि त्यानंतर उत्तमरित्या फटकेबाजी केली. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेट याने ५९ चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी केली. याशिवाय सिकंदर रझानं २१ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केल्याचे पाहायला मिळाले. ही भागीदारी टीम इंडियाच्या गोंदाजीतील उणीव दाखवून देणारी ठरली.
पुढच्या मॅचमध्ये ही चूक चालणार नाही
फलंदाजीत धमाकेदार कामगिरी केल्यावर भारतीय संघातील गोलंदाजांकडूनही सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा होती. पण अर्शदीप सिंगनं केलेल्या कामगिरीशिवाय इतर गोलंदाजांना छाप सोडता आली नाही. जसप्रीत बुमराह देखील विकेट लेस राहिला. वेस्ट इंडिज विरुद्धचा पुढचा जिंका किंवा बाहेर पडा असा आहे. याया सामन्यात दोन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. झिम्बाब्वे विरुद्ध जिथं कमी पडलो त्यात सुधारणा करून मैदानात उतरावे लागेल. पुन्हा ही चूक घडली तर ती महागात पडू शकते, असेच काहीसे संकेत भारतीय कर्णधाराने सामन्यानंतर दिले आहेत.