Suryakumar Yadav, Ind vs Eng 3rd T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी२० मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये होणार आहे. पहिल्या दोन टी२० जिंकल्याने भारताचे मनोबल उंचावले आहे. टीम इंडियाने २०२० नंतर राजकोटमध्ये एकही टी२० सामना हरलेला नाही. तसेच इंग्लंड अद्याप या मैदानावर टी२० खेळलेला नाही. त्यामुळे माप भारताकडे झुकलेले आहे. पण मालिकेतील हा सामना गमावला तर इंग्लंडला मालिका गमवावी लागेल. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडचा संघ जीवाची बाजी लावायचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव याने ७५२ दिवसांपूर्वी केलेला पराक्रम पुन्हा केल्यास भारत सहज सामना आणि मालिका जिंकू शकेल.
राजकोटमध्ये ७५२ दिवसांपूर्वी काय घडलं?
राजकोटच्या मैदानावर टीम इंडियाच्या विजयाची आकडेवारी दमदार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवची गेल्या दोन सामन्यातील आकडेवारी निराशाजनक आहे, पण या सामन्यातून त्याला सूर गवसण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे त्याने ७५२ दिवसांपूर्वी केलेली खेळी. सूर्यकुमार यादवने ७ जानेवारी २०२३ रोजी राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकमेव टी२० सामना खेळला. ७५२ दिवसांपूर्वी झालेल्या त्या सामन्यात सूर्याने एकहाती श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता आणि भारताला ९१ धावांनी विजय मिळवून दिला होता. राजकोटमधील आपल्या एकमेव टी२० डावात सूर्याने ५१ चेंडूत ९ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या होत्या.
राजकोटमध्ये इंग्लंड प्रथमच खेळणार...
इंग्लंडने तिसऱ्या टी२० साठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. त्यांनी संघात एकही बदल केलेला नाही. दुसऱ्या टी२० मध्ये इंग्लंडने चांगली झुंज दिली होती. अखेरच्या षटकात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडचे संघ व्यवस्थापन त्याच खेळाडूंवर विश्वास ठेवताना दिसत आहे. आता इंग्लंडचा संघ राजकोटमध्ये खेळणार असून ते आधी कधीच येथे खेळलेले नाहीत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात काय घडणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.