भारतीय क्रिकेटचा उगवता तारा अभिषेक शर्मासाठी यंदाचा टी-२० विश्वचषक एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या फटकेबाजीने घाम फोडणारा अभिषेक या स्पर्धेत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला. त्याच्या या खराब फॉर्ममुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असतानाच, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव त्याच्या बचावासाठी खंबीरपणे उभा राहिला आहे.
अभिषेक शर्मासाठी हा विश्वचषक आकडेवारीच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक ठरला आहे. अमेरिकाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तो शून्यावर बाद झाला. वैद्यकीय कारणास्तव नामिबियाविरुद्धच्या सामन्यातून तो बाहेर होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा केली जात होती. परंतु, या सामन्यातही तो पुन्हा शून्यावर माघारी परतला. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यातही तो खाते उघडण्यात अपयशी ठरला. या खराब कामगिरीमुळे अभिषेकच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आपल्या पहिल्या तीन डावात शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम आशिष नेहराच्या नावावर होता, जो पहिल्या दोन डावात शून्यावर बाद झाला होता.
अभिषेकच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांना उत्तर देताना सूर्या म्हणाला, "अभिषेक शर्माबद्दल काळजी करणाऱ्या लोकांची मला खरं तर काळजी वाटते. मला तर त्या संघांची जास्त काळजी वाटते ज्यांचा सामना भविष्यात अभिषेकशी होईल. गेल्या वर्षी त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे, आता त्याला फक्त आपल्या समर्थनाची गरज आहे."
जागतिक क्रमवारीत अव्वल
अभिषेकच्या सध्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या प्रतिभेवर शंका घेणे कठीण आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो सध्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. त्याच्याकडे डावाच्या सुरुवातीलाच गोलंदाजांवर दबाव टाकण्याची जबरदस्त क्षमता आहे.