Join us

दुसऱ्या स्थानी आला आपला ‘स्काय’; पाकिस्तानच्या बाबर आझमपासून केवळ २ गुणांनी मागे

टी-२० क्रमवारी मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता राखून असलेला सूर्यकुमार भारताचा ‘३६० डीग्री’ फलंदाज म्हणून ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 05:44 IST

Open in App

मागेदुबई : क्रिकेटविश्वात ‘स्काय’ नावाने ओळखला जाणाऱ्या भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याने नव्या टी-२० क्रमवारीत फलंदाजीत दुसरे स्थान पटकावले. अव्वल स्थानावरील पाकिस्तानच्या बाबर आझमच्या तुलनेत सूर्या केवळ २ गुणांनी मागे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी नवी क्रमवारी जाहीर केली.

मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता राखून असलेला सूर्यकुमार भारताचा ‘३६० डीग्री’ फलंदाज म्हणून ओळखला जातो. सध्या सुरु असलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात सूर्याची बॅट जबरदस्त तळपत आहे. मंगळवारी भारतीय वेळेनुसार मध्यरात्री संपलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने तडाखेबंद अर्धशतक झळकावताना ४४ चेंडूंत ७६ धावा कुटल्या. या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला ७ गड्यांनी नमवले. नव्या क्रमवारीनुसार सूर्याच्या खात्यात ८१६ गुण असून बाबर ८१८ गुणांसह अव्वल स्थानी आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत फारसा फरक पडलेला नाही. भारताचा भुवनेश्वर कुमार आठव्या स्थानी कायम असून ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड आणि दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी पहिल्या दोन स्थानावर विराजमान आहेत.

अव्वल दहामध्ये सूर्या एकमेव भारतीय फलंदाज असून त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला (७९४)  तिसऱ्या स्थानी फेकले. सूर्यानंतर टी-२० मध्ये सर्वोत्तम भारतीय फलंदाज इशान किशन असून तो १४व्या स्थानी आहे. 

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादव
Open in App