Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याचा विंडीजविरुद्ध तुफानी हल्ला; भारताचा दणदणीत विजय

टी-२० मालिकेतील आव्हान कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 05:33 IST

Open in App

प्रॉव्हिडेन्स : जागतिक टी-२० क्रमवारीत अव्वल असलेल्या सूर्यकुमार यादवने तडाखेबंद फटकेबाजी करताना भारताला वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ७ गड्यांनी विजयी केले. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील पिछाडी १-२ अशी कमी केली. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने २० षटकांत ५ बाद १५९ धावा केल्या. भारताने १७.५ षटकांत ३ बाद १६४ धावा करत मालिकेतील आव्हान कायम राखले.

सूर्यकुमारने ४४ चेंडूंत १० चौकार व ४ षट्कारांसह ८३ धावांची खेळी केली. त्याची रोहित शर्माच्या सर्वाधिक चार टी-२० शतकांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याची संधीही हुकली. आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण केलेला यशस्वी जैस्वाल (१) आणि शुभमन गिल (६) अपयशी ठरल्यानंतर सूर्या आणि तिलक वर्मा यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५१ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी करत भारताचा विजयी मार्ग सुकर केला. तिलकने ३७ चेंडूंत ४ चौकार व एका षट्कारांसह नाबाद ४९ धावा केल्या. अल्झारी जोसेफने १३व्या षटकात सूर्याला बाद केल्यानंतर तिलक व कर्णधार हार्दिक पांड्या (२०*) यांनी चौथ्या गड्यासाठी ३१ चेंडूंत नाबाद ४३ धावांची विजयी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्का मारला. 

त्याआधी, कुलदीप यादवने २८ धावांत ३ प्रमुख फलंदाज बाद करीत विंडीजच्या फलंदाजीला खिंडार पाडले. विंडीजकडून सलामीवीर ब्रँडन किंग आणि कर्णधार रोवमन पॉवेल यांनी फलंदाजीत छाप पाडली. किंगने ४२ चेंडूंत ५ चौकार व एका षट्कारासह ४२ धावा केल्या. 

 विचित्र गोंधळामुळे सामन्यास उशीरतिसऱ्या टी-२० सामन्यासाठी विंडीज आणि भारताचे खेळाडू मैदानात उतरल्यानंतर लगेच सर्व जण माघारीही फिरले. मैदानात ३० यार्डचा सर्कल आखलाच गेला नसल्याने सर्व खेळाडू माघारी फिरले. यामुळे सामना काही मिनिटे उशिराने सुरू झाला. अशा प्रकारे सामन्याला उशीर होण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

    आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये षट्कारांचे शतक पूर्ण करणारा सूर्यकुमार यादव हा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला.     सर्वांत कमी आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत बळींचे अर्धशतक पूर्ण करणारा कुलदीप यादव हा अजंता मेंडिस (श्रीलंका) आणि मार्क एडेर (आयर्लंड) यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठरला.

धावफलक वेस्ट इंडीज : ब्रँडन किंग झे. गो. कुलदीप यादव ४२, कायल मेयर्स झे. अर्शदीप गो. पटेल २५, जाॅन्सन चार्ल्स पायचीत गो. कुलदीप यादव १२, निकोलस पूरन स्टम्पिंग सॅमसन गो. कुलदीप यादव २०, रोवमन पाॅवेल नाबाद ४०, शिमरोन हेटमायर झे. वर्मा गो. मुकेश कुमार ९, रोमारियो शेफर्ड नाबाद २.   अवांतर : ९, एकूण : २० षटकांत ५ बाद १५९ धावा. बाद क्रम : १-५५, २-७५, ३-१०५, ४-१०६, ५-१२३. गोलंदाजी : हार्दिक पांड्या ३-०-१८-०, अर्शदीप सिंग ३-०-३३-०, अक्षर पटेल ४-०-२४-१, युझवेंद्र चहल ४-०-३३-०, कुलदीप यादव ४-०-२८-३, मुकेश कुमार २-०-१९-१.भारत : यशस्वी जैस्वाल झे. जोसेफ गो. मॅकाॅय १, शुभमन गिल झे. चार्ल्स गो. जोसेफ ६, सूर्यकुमार यादव झे. किंग, गो. जोसेफ ८३, तिलक वर्मा नाबाद ४९, हार्दिक पांड्या नाबाद २०. अवांतर : ५. एकूण : १७.५ षटकांत ३ बाद १६४. बाद क्रम : १-६, २-३४, ३-१२१. गोलंदाजी : ओबे मॅकाॅय २-०-३२-१, अकिल हुसेन ४-०-३१-०, अल्झारी जोसेफ ४-०-२५-२, रोस्टोन चेस ४-०-२८-०, रोमारियो शेफर्ड ३-०-३६-०, रोवमन पाॅवेल ०.५-०-१०-०.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसूर्यकुमार अशोक यादव
Open in App