Shikhar Dhawan Suresh Raina ED Case: सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) पीएमएलए (Prevention of Money Laundering Act 2002) कायद्यातील तरतुदींनुसार माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची ११.१४ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
ईडीने जप्ती केलेल्या संपत्तीमध्ये सुरेश रैनाच्या नावावर असलेली ६.६४ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवनच्या नावावर असलेली ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.
रैना, धवन आणि ईडी; प्रकरण काय आहे?
ईडीने ही मालमत्ता जप्त केली आहे. ईडी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विविध राज्यांच्या पोलीस यंत्रणांनी अवैध ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet च्या चालकांविरुद्ध नोंदवलेल्या अनेक FIRच्या आधारावर PMLA अंतर्गत तपास करण्यात आला.
ईडीने केलेल्या तपासामध्ये हे उघड झाले आहे की 1xBet आणि त्याचे सरोगेट ब्रँड म्हणजे 1xBat आणि 1xbat Sporting lines संपूर्ण भारतात अवैध ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराला प्रोत्साहन देण्यात आणि त्या सहजपणे लोकांपर्यंत पोहचवण्यात गुंतलेले असल्याचे आढळून आले.
या प्रकरणात क्रिकेटपटूंवर आरोप काय?
तपासात असे आढळून आले की क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन या दोघांनीही जाणूनबुजून 1xBet ला त्याच्या सरोगेट्सद्वारे प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातील संस्थांसोबत जाहिरातीचे करार केले होते.
अवैध बेटिंगमधून मिळवलेले उत्पन्न लपवण्यासाठी उत्पन्नाचा मूळ स्त्रोत लपविण्यासाठी हे करार विदेशी संस्थांमार्फत पैसे देऊन करण्यात आले होते, असे ईडीने सांगितले आहे.
1xBet भारतात कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय काम करत होतं आणि भारतीय लोकांना लक्ष्य करण्यासाठी सोशल मीडिया, ऑनलाइन व्हिडिओ आणि प्रिंट मीडियाद्वारे सरोगेट ब्रँडिंग आणि जाहिरातींचा वापर करत होतं. या जाहिरात करारांसाठीचे पैसे परदेशातील मध्यस्थांचा वापर करून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे दिले गेले होते, जेणेकरून पैसे नेमके कुठून मिळाले आहे, त्याचा मूळ अवैध स्रोत लपवता येईल.