Join us

"एवढी कसली घाई लागलीय..."; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा ३ वाक्यात निकाल

रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:16 IST

Open in App

Supreme Court on IND VS PAK Match: आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सामन्यावरुन प्रश्न उपस्थित केले जात होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सामना होऊ नये अशी भूमिका अनेकांनी मांडली होती. त्यानंतरही या सामन्याचे आयोजन करण्यात आलं. यानंतर आता आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना दिलेल्या निकालाने १४ सप्टेंबर रोजी सामना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानशी सामना खेळणे हे राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या आणि जनभावनेच्या विरुद्ध असल्याचे मत अनेकांना व्यक्त केलं होतं. त्यातूनच पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांच्यासह उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी मॅचसंदर्भात याचिका दाखल केली होती. ही याचिका वकील स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती. संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत आदेशपत्र किंवा इतर योग्य आदेश जारी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती ज्यामुळे हा सामना रद्द घोषित करता येईल.

मात्र आता क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. ही एक क्रिकेट मॅच आहे, ती होऊ द्या, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. याचिकाकर्त्यांनी या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली. ही मॅच रविवारी आहे, त्यामुळे शुक्रवारीच सुनावणी झाली पाहिजे, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं. 

यावर न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने, एवढी काय घाई आहे? ही फक्त मॅच आहे, ती होऊ द्या. मॅच या रविवारी आहे, काय करता येईल? असं म्हटलं. त्यावर पुन्हा याचिकाकर्त्यांनी, कदाचित आमची याचिका फारशी चांगली नसेल पण तुम्ही ती याचिका सुनावणीसाठी घ्यावी, असं म्हटलं. त्यावर कोर्टाने "नाही, अजिबात नाही" असं उत्तर दिलं.

दरम्यान, उर्वशी जैन यांनी संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत ही जनहित याचिका दाखल केली होती. यामध्ये आशिया कप टी२० लीगचा भाग म्हणून १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई येथे होणारा भारत-पाकिस्तान टी२० क्रिकेट सामना रद्द करण्याचे निर्देश तात्काळ देण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, २०२५ च्या अंमलबजावणीसाठी निर्देश देण्यास देखील सांगितले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर, ज्यामध्ये भारतीय नागरिक आणि सैनिकांनी आपले प्राण गमावले, त्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना आयोजित करणे हा राष्ट्रीय प्रतिष्ठेशी विसंगती असल्याचे दाखवतो. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत खेळणे हे सशस्त्र दलांचे मनोबल कमकुवत करते आणि शहीदांच्या कुटुंबियांसाठी अपमानकारक आहे. क्रिकेटला राष्ट्रीय हित, देशातील लोकांचे जीवन आणि सैन्याच्या निष्ठा आणि बलिदानापेक्षा महत्त्वाचे ठरवले जाऊ शकत नाही, असेही या याचिकेत म्हटलं होतं.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानसर्वोच्च न्यायालयपहलगाम दहशतवादी हल्ला