शारजाह : गत चॅम्पियन सुपरनोवाजला महिला टी-२० चॅलेंजमध्ये आव्हान कायम राखण्यासाठी शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत आत्मविश्वास उंचावलेल्या ट्रेलब्लेझर्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल.
वेलोसिटीविरुद्ध गुरुवारी मिळविलेल्या शानदार विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्स संघ आणखी एक विजय नोंदवण्यास उत्सुक आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर दोन विजयाची नोंद होईल आणि ९ नोव्हेंबरला खेळल्या जाणाऱ्या फायनलसाठी पात्र ठरता येईल. पण, सुपरनोवाजला आणखी एक पराभव पत्करावा लागला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. 
ट्रेलब्लेझर्सने वेलोसिटीविरुद्ध शानदार कामिगरी केली. त्यांनी त्यांचा डाव केवळ ४७ धावांत गुंडाळला. त्यात इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनची भूमिका महत्त्वाची ठरली. जागतिक क्रमवारीत अव्वल टी-२० गोलंदाज एक्लेस्टोनने ३.१ षटकात ९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले होते. मानधनाला तिचे गोलंदाज हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोवाजविरुद्ध शानदार कामगिरी करतील अशी आशा आहे. सुपरनोवाजने एक विजय मिळवला तर अंतिम फेरीतील संघ नेट-रनरेटच्या आधारावर निश्चित होतील. त्यात वेलोसिटी संघ बाहेर होण्याची शक्यता अधिक आहे. कारण त्यांचा नेट रनरेट (-१.८६९) निगेटिव्ह आहे. 
दरम्यान,  सुपरनोवाज संघ या लढतीत पराभूत व्हावा, असे वेलोसिटी संघाला असे वाटत असेल. त्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठण्याची संधी राहील. भारतीय टी-२० महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर स्पर्धेच्या सलामी लढतीतील कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असेल.