हैदराबाद : आयपीएलमधील पहिलाच सामना खेळणाऱ्या अल्झारी जोसेफने १२ धावांत घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनराजर्स हैदराबादवर ४० धावांनी मात केली. कमी धावसंख्या असलेला हा सामना गोलंदाजांनी गाजवला.
मुंबई इंडियन्सने हैदराबादसमोर विजयासाठी १३७ धावांचे आव्हान ठेवले. डेव्हिड वॉर्नर व बेअरस्टॉ या दोघांना चांगली सलामी देता आली नाही. वॉर्नर १५ तर बेअरस्टॉ १६ धावांवर बाद झाले. त्यानंतर मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी आपला करिष्मा दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी हैदराबादच्या कोणत्याही फलंदाजाला स्थिराऊ दिले नाही. मनिष पांडे (१६), दीपक हुडा (२०) मोहमद नबी (११) यांनाच दोन अंकी धावा काढता आल्या.
मुंबईच्या जोसेफ अल्झारी याने १२ धावांत ६ बळी घेत हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. राहुल चहर याने दोन तर बुमराह व बेहरनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
तत्पूर्वी हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित माऱ्यामुळे मुंबई इंडियन्सला २० षटकांत १३६ धावाच करता आल्या. हैदराबादने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधाराचा हा निर्णय योग्य असल्याचे हैदराबादच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. मुंबईला सातत्याने धक्के देत हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजीला सुरुवातीलाच धक्के दिले.
मोहमद नबीने रोहित शर्माचा (११) पहिला अडथळा दूर केला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला शून्यावर असताना जीवदान मिळाले होते. पण रोहितला यावेळीही मोठी खेळी साकारता आली नाही. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहता आले नाही. क्वांटन डिकॉकही संघासाठी काही करू शकला नाही. सिद्धार्थ कौलने त्याला १९ धावांवर तंबूत परतवले.
चेन्नईविरुद्ध धुवाधार फलंदाजी केलेल्या सूर्यकुमारलाही आज आपले कौशल्य दाखवता आले नाही. तो सात धावा काढून बाद झाला. पांड्या बंधंूपैकी एक असलेल्या कृणालची बॅटही आज तळपली नाही. कौलनेच त्याला बाद केले. हार्दिक पांड्या (१४) बाद झाल्यानंतर मुंबईच्या मोठ्या धावसंख्येची आशा मावळली.
मात्र, पोलार्डने योग्यवेळी आक्रमक पावित्रा घेत २६ चेंडूंत ४६ धावा केल्या. पोलार्डने एक षट्कार व ४ चौकारांच्या साह्याने आपली खेळी सजवली. पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावरच मुंबई इंडियन्स समाधानकारक धावसंख्या उभारु शकला.
अल्झारी जोसेफचे विक्रमी पदार्पण
१मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाºया जोसेफ अल्झारीने पहिल्याच सामन्यात विक्रमी कामगिरी केली. त्याने १२ धावांत ६ बळी घेतले.
२या पुर्वी हा विक्रम सोहेल तन्वीर याच्या नावावर होता. तन्वीरने २००८मध्ये पहिल्याच आयपीएलमध्ये १४ धावांत ६ बळी घेतले होते. त्याचा विक्रम १२ वर्षांनी अल्झारीने मोडीत काढला. तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध हा विक्रम केला होता.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकात ७ बाद १३६ : रोहित शर्मा ११, क्वांटन डिकॉक १९, किरॉन पोलार्ड नाबाद ४६, हार्दिक पांड्या १४; सिद्धार्थ कौल २/३४, नबी १/१३ संदीप १/२०. सनरायजर्स हैदराबाद : षटकांत १७.४ बाद ९६; वॉर्नर १५, बेअरस्टॉ १६, दीपक हुडा २०, अल्झारी जोसेफे ६/१२, राहुल
चहर २/२१,बुमराह १/१६ बेहरनडॉर्फ १/२८