Join us  

धोनीने एवढ्यात निवृत्त व्हायला नको होते, नाराज गावसकरांना आली धोनीची आठवण

धोनीने निवृत्ती घेतली नसती तर बरं झालं असतं. धोनीने ठरवलं असतं तर तो अजून खेळू शकला असता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 3:38 PM

Open in App

सेंच्युरियन पार्क - पहिल्या कसोटी प्रमाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीतही टीम इंडियाचा  135 धावांनी दारूण पराभव झाला. भारतीय संघाच्या कामगिरीने सर्वांची निराशा तर झालीच आहे पण या दौऱ्यातील संघनिवडीवरूनही बरीच चर्चा आणि वादही सुरू आहेत. परदेशातील यशस्वी भारतीय फलंदाज आणि टीमचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय,  पहिल्या कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज भुवनेश्वरला दुस-या कसोटीत न खेळवण्याचा निर्णय, सामन्याच्या चौथ्या दिवशी तिसरी विकेट गेल्यावर रोहित शर्माला दिलेली बढती, किंवा खडतर परिस्थितित पार्थिव पटेलला फलंदाजीस पाठवण्याचा निर्णय यासारख्या अनेक निर्णयांवर क्रिकेट चाहत्यांसह आता माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही मत मांडलं आहे. यावेळी बोलताना गावसकर यांनी आता कसोटीत माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कमतरता जाणवत असल्याचे वक्तव्य केले आहे. धोनीने एवढ्यात निवृत्त व्हायला नको होते असं ते म्हणाले आहेत. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.गावसकर म्हणाले, ''तुम्ही पहिल्या कसोटीतील संघनिवड बघा, त्यानंतर दुस-या कसोटीतील संघनिवड आणि इतर बाबी पाहा. हा संघ सध्या वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे आणि त्यावर आपल्यापैकी कुणीही प्रश्न विचारू शकत नाही. भारतीय क्रिकेटशी जोडलेल्या आपण सर्वा आता ते जे काही करत आहे ते योग्य ठरावे एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. पहिल्या कसोटीत तर ते योग्य ठरले नाही, दुस-या कसोटीतही ते आतापर्यंत योग्य ठरत असल्याचं कोणतंही चित्र दिसत नाही''.भारतीय टीमच्या प्रदर्शनाने गावसकर इतके नाराज दिसले की यावेळी बोलताना त्यांना माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण आली. धोनीची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले. धोनीने इतक्यात निवृत्ती घ्यायला नको होती, असे ते म्हणाले. ''धोनीने निवृत्ती घेतली नसती तर बरं झालं असतं. धोनीने ठरवलं असतं तर तो अजून खेळू शकला असता, पण त्याच्यावर कर्णधारपदाचा खूप दबाव होता हे स्पष्ट आहे. माझ्यामते धोनीने कर्णधारपद सोडून केवळ यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून खेळायला हवं होतं. ड्रेसिंग रूममध्ये धोनीचा सल्ला अत्यंत उपयूक्त ठरला असता, पण कदाचित न खेळणेच त्याला योग्य वाटले असेल''. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८क्रिकेटभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका