Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2022: "जर भारताने हा टी-20 वर्ल्डकप जिंकला नाही तर...", IND vs PAK सामन्यापूर्वी सुनिल गावस्करांचं मोठं विधान

भारतीय संघाचा टी-20 विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:11 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाला टी-20 विश्वचषकातील आपली मोहिम पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून सुरू करायची आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. मागील टी-20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे रविवारच्या सामन्यातून भारतीय संघ आपल्या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहण्याजोगे असेल. भारतीय संघाने 2007मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता त्याला आता 11 वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे रोहितसेनेकडून भारतीय चाहत्यांनी पुन्हा एकदा विजयाची आशा असेल.

मात्र भारतीय संघाची विश्वचषक मोहीम सुरू होण्यापूर्वी महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी एक मोठे विधान केले आहे. गावस्करांनी म्हटले की, जर भारतीय संघाने हा विश्वचषक जिंकला नाही तर संघ अर्ध्या तयारीने ऑस्ट्रेलियाला गेला होता किंवा तयारीचा अभाव होता हे कारण सांगता येणार नाही. कारण भारतीय संघाने चांगली तयारी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

भारताने चांगल्या संघाविरूद्ध सराव सामना खेळला आहे गावस्करांनी 'मिड-डे'साठी लिहलेल्या लेखात म्हटले आहे की, "एक गोष्ट नक्की आहे. जर भारतीय संघ हा टी-20 विश्वचषक जिंकू शकला नाही, तर ते तयारीच्या अभावामुळे होणार नाही. एवढेच नाही तर संघ स्पर्धेच्या पहिल्या सामन्याच्या जवळपास तीन आठवडे आधी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. सराव सामनेही खेळत आहेत. तसेच त्यांनी चांगल्या संघांविरुद्ध सराव सामने खेळले आहेत, ज्यामुळे त्यांना स्पर्धेची तयारी करण्यास मदत होईल. 'तुम्ही तयारी करण्यात अपयशी ठरलात तर अयशस्वी होण्यासाठी तयार राहा' ही जुनी म्हण या भारतीय संघाला लागू होणार नाही. कारण भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील सामन्यांशिवाय मायदेशात देखील सहा टी-20 सामने खेळले असून त्यापैकी चार जिंकले आहेत."

चषक पुन्हा भारताकडे यावा - गावस्कर तसेच भारताने नेहमीच व्हाईट बॉलच्या द्विपक्षीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, मग ते मायदेशात असोत किंवा परदेशात. मात्र बहुपक्षीय स्पर्धांमध्ये अनेकवेळा संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पण यावेळी तसे नाही. यावेळी तसे नाही कारण संघात युवा आणि अनुभव खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे. त्यामुळे चषक पुन्हा एकदा भारताकडे यावा अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा नसतानाही या भारतीय संघाबद्दल खूप चर्चा होत आहे. असे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी अधिक म्हटले. 

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई. 

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न13 नोव्हेंबरला अंतिम सामना 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्मासुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघ
Open in App