२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघात काही धक्कादायक बदल पाहायला मिळाले. विशेषतः फॉर्मात असलेला फलंदाज शुभमन गिल आणि यष्टीरक्षक जितेश शर्मा यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे, यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी जितेश शर्माला संघातून वगळल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावस्कर यांच्या मते, जितेश केवळ एक उत्तम यष्टीरक्षकच नाही, तर मैदानावर कर्णधाराला मदत करणारा खेळाडू आहे. गावस्कर म्हणाले की, "धोनीनंतर स्टंप्सच्या मागून डीआरएसबाबतीत कर्णधाराला अचूक मदत करण्यात जितेश माहिर आहे. त्याला मिळालेल्या संधींमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केले होते. फिनिशर म्हणून खेळणे ही सर्वात कठीण भूमिका असते. त्याला केवळ पाच डावांत फलंदाजीची संधी मिळाली, ज्यात त्याने १५८.९७ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने ६२ धावा केल्या. या कठीण भूमिकेसाठी हे आकडे नक्कीच वाईट नाहीत."
ईशान किशनचे दमदार पुनरागमन
दुसरीकडे, ईशान किशनच्या निवडीवर गावस्करांनी आनंद व्यक्त केला. ईशानने आयपीएलवर अवलंबून न राहता देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ५०० हून अधिक धावा कुटून त्याने झारखंडला विजेतेपद मिळवून दिले. या कामगिरीचे कौतुक करताना गावस्कर म्हणाले की, "जेव्हा एखादा खेळाडू अशी कामगिरी करतो, तेव्हा त्याची निवड होणे योग्यच आहे."
२०२६च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकु सिंह, इशान किशन (यष्टीरक्षक)