सुनील गावसकर
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी कचखाऊ वृत्तीमुळे गोलंदाजांच्या कष्टावर पाणी फेरले. त्याआधी त्यांनी भारताला सोप्या धावसंख्येवर रोखले होते. या खेळपट्टीवर चेंडूला अतिरिक्त उसळी होती. विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना झुंजवलेदेखील. शिस्तबद्ध तसेच अचूट टप्प्यावर मारा केलाच शिवाय आखूड टप्प्याच्या चेंडूंचा वापरही शिताफीनेच केला. क्षेत्ररक्षकांची आणखी चांगली साथ लाभली असती तर विंडीजच्या गोलंदाजांनी भारताला २०० धावादेखील काढू दिल्या नसत्या. काही झेल सुटतात, हे समजू शकतो. पण ढिसाळ क्षेत्ररक्षणासाठी कुठलेही कारण देता येणार नाही. अनेक क्षेत्ररक्षक या स्तरावर सुमार कामगिरी करताना दिसले.
ऋषभ पंतला सलामीला पाहून चाहते हैराण झाले. लोकेश राहुल उत्कृष्ट सलामीवीर असताना पंतला संधी देण्यावर कठोर टीका झाली. पंत नव्या चेंडूवर चाचपडला. पुढच्या सामन्यात हाच प्रयोग होतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. टीम इंडियाने मालिका जिंकल्याने प्रयोगाला वाव असेल. मात्र, हे प्रयोग दूरदृष्टीने व्हावेत. भविष्याचा विचार करुन प्रयोग न झाल्यास संघात अफरातफर माजण्याची शक्यतादेखील नाकारता येणार नाही.
सूर्याने पुन्हा एकदा संयमाचा परिचय दिला. लोकेश राहुलसोबत त्याने संघाची पडझड थोपवली. धावसंख्येला आकार दिला. आपला संघ २००च्या आत बाद होणार नाही, अशी दोघांनी खातरजमा केली. दीपक हुडा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात गडी बाद करत धडक वाटचालीचे संकेत दिले आहेत. प्रसिद्ध कृष्णा यानेदेखील शानदार कामगिरी करत खेळपट्टीवरील उसळीचा लाभ घेतला. १२ धावात त्याने चार फलंदाजांना माघारी धाडले. कृष्णा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या चेंडूंवर विंडीजचे गोलंदाज घाबरल्यासारखे झाल्याचे पाहणे सुखद होते. प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याच कडू औषधाची अधिक मात्रा पाजणे, यापेक्षा चांगली बाब कुठली असू शकेल? (टीसीएम)