Sunil Gavaskar on Virat Kohli Century, IND vs AUS : टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या कसोटीत पराभूत केले. पर्थवर ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. ५३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना, भारताने यजमानांवर २९५ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. भारताचा हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराहने सामन्यात ८ बळी घेतले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार दीडशतक ठोकले. पण सर्वाधिक चर्चा झाली ती विराट कोहलीच्या शतकाची. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके ठोकली होती. पण गेले वर्षभर तो कसोटीत फ्लॉप ठरत होता. त्यामुळे हे शतक खास ठरले. यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही प्रतिक्रिया दिली.
"विराट दुसऱ्या डावात जेव्हा मैदानात खेळायला आला तेव्हा तो खूप रिलॅक्स होता. पहिल्या डावात भारताच्या पहिल्या दोन विकेट्स पकटन गेल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावरही दडपण होते. दुसऱ्या डावात मात्र त्याचा बॅटिंगचा स्टान्स बदलला. फलंदाजी करताना क्रीजमध्ये त्याच्या पायांची होणारी हालचालदेखील समाधानकारक होती. फलंदाजीसाठी उभे राहण्याचा स्टान्स बदलल्याने त्याला अपेक्षित उंची मिळाली आणि उसळणाऱ्या चेंडूंचा सामना करणे अधिक सोपे झाले. ऑस्ट्रेलियात खेळत असाल तुम्हाला ही अतिरिक्त उंची नेहमीच कामी येते. तोच प्लॅन विराटला फायद्याचा ठरला," असे सुनील गावसकर म्हणाले.
शतकामुळे विराटला क्रमवारीत बढती
पर्थ टेस्टमधील दोन्ही शतकवीरांनीही कसोटी क्रमवारीत मोठी दमदार प्रगती केली. भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने १६१ धावांची दमदार दीडशतकी खेळी केली. त्याला २ स्थानांची बढती मिळून तो आता ८२५ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तसेच महान फलंदाज विराट कोहली यानेही नाबाद १०० धावांची खेळी करत ९ स्थानांची झेप घेतली आहे. तो आता ६८९ धावांच्या गुणांसह १३व्या स्थानी आला आहे. टीम इंडियाकडून TOP 10 मध्ये केवळ रिषभ पंत ७३६ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.
६ डिसेंबरपासून दुसरी कसोटी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानात रंगणार आहे. पर्थ कसोटी सामन्यातील दमदार विजयानंतर भारतीय संघ पिंक बॉल टेस्टमध्ये बेस्ट कामगिरी करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. दुसरी कसोटी ६ ते १० डिसेंबर दरम्यान आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ॲडलेडला जाण्याआधी भारतीय संघ कॅनबेराला पोहचला आहे. टीम इंडियाचा दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानात असला तरी पिंक बॉल कसोटीआधी टीम इंडिया प्राइम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यामुळे ॲडलेडला जाण्याचा टीम इंडियाचा मार्ग व्हाया कॅनबेरा असा ठरवण्यात आला आहे.