सुनील गावस्कर लिहितात...
भारतीय संघ केवळ ८० टक्के क्षमतेनेच खेळला, असे जेव्हा कर्णधार विराट कोहलीने सांगितले त्यावेळी त्यात लवकरच १०० टक्के क्षमतेने खेळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये त्याची प्रचिती आली. सर्वांनी आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावल्यानंतर अन्य संघांना त्याची बरोबरी साधणे शक्य नसल्याचे दिसून आले.
आघाडीच्या चार फलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यानंतर तळाच्या फळीला विशेष श्रम करण्याची गरज भासली नाही. आघाडीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीवर लगाम घातला आणि अखेरही त्यांनी कामगिरीत सातत्य राखले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी जर मधल्या षटकांमध्ये धावगती वाढविता येईल, असा विचार केला असेल तर त्यांना मनगटाच्या जोरावर फिरकी मारा करणारे चहल व कुलदीप यांनी चकित केले. चहल-कुलदीपने अचूक मारा करीत त्यांना शालेय क्रिकेटपटू ठरवले. या दोन्ही गोलंदाजांची क्षमता बघता, ते भारताला केवळ पांढºया चेंडूनेच नाही तर लाल चेंडूनेही अनेक सामने जिंकून देऊ शकतात.
कसोटी मालिका गमावणे भारतासाठी निराशाजनक ठरले. पराभूत झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत भारताने पहिल्या तीन डावांमध्ये वर्चस्व गाजवले, पण चौथ्या डावात सामना गमावला. चौथ्या डावामध्ये भारताला मधल्या फळीत स्थैर्य लाभले नाही. त्यांना रहाणेची उणीव भासली. या दोन्ही डावांमध्ये कोहलीचे अपयश निकालावर परिणाम करणारे ठरले. कसोटी मालिकेत विराटचे व्यक्तिमत्त्व अन्य उर्वरित २१ खेळाडूंच्या तुलनेत वेगळे भासले. रग्बी खेळाडू मुसंडी मारतो त्याची प्रचिती विराटच्या कामगिरीने आली.
भारतीय संघाला यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत कधीच मालिका जिंकता आलेली नव्हती. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारती़य संघाने मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये विजय मिळवला. अशी कामगिरी करणारा हा पहिला भारतीय संघ ठरला. भारतीय संघाने कसोटी मालिकाही जिंकली असती तर भारतीय क्रिकेट इतिहासात संस्मरणीय ठरले असते आणि त्यामुळेच भारतीय संघासाठी हा दौरा ८० टक्के यश देणारा आहे. (पीएमजी)