Fighter Rishabh Pant took heavy blows, Ind vs Aus 5th Test Video: बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ९ धावांवर उस्मान ख्वाजाची १ विकेट गमावली. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव १८५ धावांवर आटोपला. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावा तर रवींद्र जाडेजाने झुंजार २६ धावांची खेळी केली. शेवटच्या टप्प्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने केलेल्या २२ धावांमुळे भारताने कशीबशी १८५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय फलंदाजांना छाप पाडता आली नसली तरी रिषभ पंतची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याचे कारण म्हणजे अंगावर चेंडू लागूनही त्याने दाखवलेली लढाऊवृत्ती आणि संघासाठी केलेला संघर्ष.
स्वभावाविरूद्ध खेळला, कांगारूंना नडला...
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड आणि पदार्पणवीर ब्यू विबस्टर या चार वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. अनुभवी खेळाडूंपासून ते नवख्यापर्यंत कुणीही फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकले नाही. पण रिषभ पंतने मात्र आपला नैसर्गिक आक्रमक खेळ न करता अतिशय बचावात्मक खेळ करून दाखवला. त्याने ९८ चेंडूंचा सामना केला. त्यात त्याने केवळ ३ चौकार आणि १ षटकार मारला. इतर सर्व चेंडूंवर त्याने बचाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात आज पंतला अनेकदा वेगवान चेंडू अंगावर लागला. बाऊन्सर चेंडू खेळताना दोन वेळा त्याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. एक दोन वेळा मांड्याजवळ चेंडू लागला. इतकेच नव्हे तर मिचेल स्टार्कचा एक चेंडूत त्याच्या दंडावर लागला, त्यावेळी तो कळवळला, चेंडू लागल्याने त्याचे रक्तदेखील गोठले, पण त्याने हार मानली नाही. तो खेळतच राहिला. त्याचा हा संघर्ष पाहून अनेकांना चेतेश्वर पुजाराचीही आठवण झाली.
दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराह याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सिडनीच्या खेळपट्टीवर भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल (१०), केएल राहुल (४), शुबमन गिल (२०), विराट कोहली (१७) झटपट तंबूत परतले. रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. पण पंत ४० धावा काढून तर नितीश रेड्डी शून्यावर माघारी परतला. जाडेजाने २६ तर वॉशिंग्टन सुंदरने १४ धावांची झुंज दिली. शेवटच्या टप्प्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने (२२) फटकेबाजीचा प्रयत्न करत संघाला १८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत अवघ्या ३ षटकांत बुमराहने शेवटच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला माघारी धाडले.