Steve Smith Century, SL vs AUS 1st Test : भारतीय संघाविरूद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना पावसामुळे खेळ थांबेपर्यंत ऑस्ट्रेलियाने २ बाद ३३० धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने दमदार शतक (नाबाद १४७) ठोकले. ट्रेव्हिस हेड ५७ धावांवर तर मार्नस लाबूशेन २० धावांवर बाद झाला. पण पुन्हा कर्णधारपदाची माळ गळ्यात पडलेल्या स्टीव्ह स्मिथने मात्र दमदार शतक ठोकले. नाबाद १०४ धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने मोठी कामगिरी करत सुनील गावसकर, ब्रायन लारा या दिग्गजांना मागे टाकले.
स्टीव्ह स्मिथच्या बॅटमधून शानदार खेळी पाहायला मिळाली. चौथ्या क्रमांकावर खेळताना स्टीव्ह स्मिथने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. त्याने १७९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचे कसोटी क्रिकेटमधील हे ३५ वे शतक ठरले. यासह त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सुनील गावस्कर आणि ब्रायन लारासारख्या दिग्गजांना मागे टाकले. श्रीलंकेचा महेला जयवर्धने, वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा, भारताचा सुनील गावस्कर आणि पाकिस्तानचा युनिस खान यांनी कसोटीत ३४ शतके झळकावली आहेत. पण स्टीव्ह स्मिथ या यादीत पुढे निघाला आहे.
स्टीव्ह स्मिथसाठी आतापर्यंतची ही खेळी खूप खास होती. या खेळीत त्याने कसोटीतील १० हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो केवळ चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १० हजार धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या नावे आहे. त्याने १११ कसोटी सामन्यातील १९५ डावात दहा हजार धावांचा पल्ला गाठला होता. तर श्रीलंकेचा कुमार संगकाराने ११५ सामन्यातील १९५ डावात हा आकडा गाठला होता. स्मिथने श्रीलंकेविरूद्ध खेळताना ११५ सामन्यातील २०५ डावात हा पराक्रम केला. या यादीत यूनिस खान (११६ सामने), रिकी पॉन्टिंग (११८ सामने), जो रुट (११८ सामने), राहुल द्रविड (१२० सामने) आणि सचिन तेंडुलकर (१२२ सामने) यांचा नंबर लागतो.
Web Title: Steve smith scored 35 test century surpasses sunil gavaskar brian lara in SL vs AUS 1st Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.