Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ती माझी मोठी चूक" २२ वर्षांपूर्वी सचिन आणि टीम इंडियासाठी ‘खलनायक’ ठरलेल्या पंच बकनर यांची कबुली

सचिन फलंदाजीला उभा राहिला की, बकनर यांना बोट वर करण्याची जणू घाईच असायची.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 18:21 IST

Open in App

Steve Bucknor On Controversial LBW Decision Against Sachin Tendulkar  क्रिकेटच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर  सचिन तेंडुलकरने अनेक दिग्गज गोलंदाजांची आव्हाने परतवून लावली. पण एक नाव असं होतं, ज्याचा उल्लेख झाला की, भारतीय चाहत्यांच्या भुवया आजही उंचावतात. ते नाव दुसरे तिसरे कोणी नाही तर ते आहेत पंच स्टीव बकनर. सचिन फलंदाजीला उभा राहिला की, बकनर यांना बोट वर करण्याची जणू घाईच असायची.  सचिनला अनेकदा वादग्रस्त निर्णयांमुळे मैदान सोडावं लागलं आणि त्या यादीत बकनर हे नाव सर्वांत आघाडीवर राहिलं. भारतीय चाहत्यांच्या नजरेत त्यांची प्रतिमा काहीशी ‘खलनायकाची’च बनली होती.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

...अन् ब्रिस्बेनमध्ये रंगला मोठा वाद

२००३–०४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ब्रिस्बेन कसोटी सामना आजही अनेक चाहत्यांना सचिन, बकनर आणि पायचितचा तो वादग्रस्त निर्णय  यामुळे आठवणीत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याच्या चेंडूवर सचिनला पायचीत बाद देण्यात आलं. बकनर यांनी बोट वर करताच मैदानात आणि नंतर संपूर्ण क्रिकेटविश्वात या निर्णयाची चर्चा रंगली होती. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं की चेंडू उसळी घेत स्टंप्सच्या वरून जात होता. तरीही दिलेल्या त्या निर्णयामुळे सचिन अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. हा निर्णय क्रिकेट इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णयांपैकी एक ठरला. आता तब्बल २२ वर्षांनंतर बकनर यांनी त्या निर्णयावर भाष्य करत आपली चूक मान्य केली आहे.

बकनर नेमकं काय म्हणाले?

७९ वर्षीय स्टीव बकनर यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट अंपायर्स असोसिएशनला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत कबुली दिली. “सचिन तेंडुलकरला एल्बीडब्ल्यू देणं ही माझी मोठी चूक होती. आयुष्यात चुका होतात. लोक आजही त्या निर्णयाबद्दल बोलतात. मी ती चूक मान्य करतो,” असं त्यांनी म्हटलं आहे. या कबुलीनंतर भारतीय चाहत्यांच्या जुन्या जखमा पुन्हा उघडल्या असल्या, तरी सत्य बाहेर आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील निर्णयही ठरला होता वादग्रस्त 

ब्रिस्बेनपुरताच हा मुद्दा मर्यादित नव्हता. भारत-पाकिस्तान सामन्यात अब्दुल रझाकच्या चेंडूवर बॅटला स्पर्श नसतानाही सचिनला झेलबाद देण्यात आलं होतं. त्या निर्णयावरही मोठा वाद झाला होता.

सचिनने नेहमीच खिलाडूवृत्ती जपली 

वादग्रस्त निर्णय असूनही सचिनने कधीही मैदानात पंचांशी वाद घातला नाही. उलट संयम आणि खेळाडूवृत्ती जपली. ‘Ask Me Anything’ सत्रात त्यांनी या प्रसंगाची आठवण काढताना विनोदाने म्हटलं होतं, “मी फलंदाजी करत असताना बकनर यांनी बॉक्सिंग ग्लोव्हज घातले असते तर कदाचित बोट वर केलं नसतं!”

English
हिंदी सारांश
Web Title : Umpire Bucknor admits his wrong decision against Sachin Tendulkar after 22 years.

Web Summary : Steve Bucknor confessed to wrongly giving Sachin Tendulkar out LBW in 2003. The controversial decision in the Brisbane Test haunted fans. Bucknor acknowledged his mistake after 22 years, a decision affecting a Pakistan match too.
टॅग्स :सचिन तेंडुलकरभारतीय क्रिकेट संघ