Sri Lanka vs Pakistan 1st Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बाबर आजम ( Babar Azam) वन मॅन आर्मीसारखा खेळला. यजमानांच्या पहिल्या डावातील २२२ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ७ फलंदाज ८५ धावांत तंबूत परतले होते, तेव्हा कर्णधार बाबरने एक बाजू लावून धरताना संघाला २१८ धावांपर्यंत पोहोचवले. बाबरने आजच्या शतकी खेळीत अनेक विक्रम मोडले, परंतु त्याच्या कॅप्टन्स इनिंग्सने क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून त्याचे हे ९वे शतक ठरले अन् त्याने ७० डावांत हा पराक्रम केला आहे.
यजमान श्रीलंकनेने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावांपर्यंत मजल मारली. दिनेश चांडिमल ( ७६), ओशाडा फर्नांडो ( ३६) व महिश तीक्शाना ( ३८) यांनी
पाकिस्तानी गोलंदाजांचा धैर्याने सामना केला. शाहिन शाह आफ्रिदीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर हसन अली व यासीर शाह यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. प्रत्युत्तरात पाकिस्तानची अवस्थाही वाईट झाली आहे. प्रभात जयसुर्याने दुसऱ्याच कसोटीत दमदार कामगिरी करताना पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी पाठवला. पाकिस्तानची अवस्था ९ बाद १४८ अशी झालेली असताना बाबर व नसीम शाह यांनी संघर्ष केला. बाबरने ८व्या, ९व्या व दहाव्या विकेटसाठी अनुक्रमे २७ ( यासीर शाह, ७९ चेंडू), ३६ ( हसन अली, ४९ चेंडू) व ७० ( नसीम शाह, १८५ चेंडू) धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा डाव सावरला. बाबर २४४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ११९ धावांवर माघारी परतला अन् पाकिस्तानचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. नसीम ५२ चेंडूंत ५ धावांवर नाबाद राहिला.
![]()
पाकिस्तानच्या पहिल्या डावातील एकूण धावसंख्येतील ५४.५८ टक्के धावा या बाबरने केल्या आहेत. १९८७ नंतर पाकिस्तानी कर्णधाराकडून हे सर्वाधिक योगदान आहे. यापूर्वी लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध हनिफ मोहम्मद यांनी ३५४ पैकी १८७ धावा स्वतः केल्या होत्या आणि त्यांची टक्केवारी ५२.८२ इतकी होती.
दरम्यान, बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम या कसोटीतून केला. त्याने २२८ डावांमध्ये हा टप्पा ओलांडून विराट कोहलीचा ( २३२ डाव) विक्रम मोडला. बाबर हा सर्वात कमी डावांमध्ये १० हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा आशियाई खेळाडू ठरला आहे, तर जगभरात तो पाचव्या क्रमांकावर आहे. आशियाई खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर ( २४३) , जावेद मियाँदाद ( २४८) व सौरव गांगुली ( २५३) हे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत. वेस्ट इंडिजचे दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी २०६ डावांमध्ये १० हजार धावा केल्या होत्या. त्यानंतर ब्रायन लारा ( २२०), हाशिम आमला ( २१७) व जो रूट ( २२२) यांचा क्रमांक येतो.