Join us  

श्रीलंकेच्या खेळाडूवर आयसीसीकडून एका वर्षाची बंदी

या खेळाडूला यापूर्वी 2018 साली निलंबित करण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:09 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला श्रीलंकेच्या क्रिकेट संघामध्ये काही गोष्टी धुमसत आहे. श्रीलंकेने सुरुवातीला पाकिस्तानच्या दौऱ्यावर जायचे ठरवले होते, पण आता त्यांनी या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. आता त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. दुसरीकडे त्यांच्या एका खेळाडूवर आयसीसीने एका वर्षाची बंदी घातली आहे.

अवैध गोलंदाजी शैली असल्यामुळे श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजयावर आयसीसीने एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवासांपूर्वी अकिलाच्या गोलंदाजीबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर आयसीसीने अकिलाची गोलंदाजी शैलीची चाचणी घेतली. या चाचणीमध्ये अकिलाची गोलंदाजी शैली अवैध असल्याचे समोर आले. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली आहे. त्यामुळे किमान एक वर्ष तर अकिलाला श्रीलंकेकडून खेळता येणार नाही.

श्रीलंकेतील गॉल येथे न्यूझीलंडचा कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी अकिलाच्या गोलंदाजी शैलीवर प्रश्न उठवण्यात आले होते. आयसीसीने चेन्नई येथे 29 ऑगस्टला अकिलाला चाचणीसाठी बोलावले होते.

अकिलाला यापूर्वी 2018 साली निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर अकिलाने आपल्या गोलंदाजी शैलीमध्ये काही बदल केले होते आणि त्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला होता. त्यामुळे या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा अकिलाला गोलंदाजी करण्याची संधी दिली होती.

याबाबत आयसीसीने सांगितले की, " अकिलाच्या बाबतीत ही गोष्ट दुसऱ्यांदा घडली आहे. पहिल्यांदा त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पण दुसऱ्यांदा त्याची शैली अवैध ठरली आहे. त्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे."

टॅग्स :आयसीसीश्रीलंकाचेन्नई