आशियाई किंग्ज श्रीलंकेने झिम्बाब्वेला पराभूत करून भारतात होणाऱ्या विश्वचषकात जागा मिळवली आहे. त्यामुळे तब्बल १५१ महिन्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा भारत विरूद्ध श्रीलंका असा सामना रंगणार आहे. अलीकडेच आयसीसीने आगामी वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २ नोव्हेंबर रोजी भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने असणार आहेत. सध्या झिम्बाब्वेमध्ये विश्वचषकाच्या पात्रता फेरीचे सामने खेळवले जात आहे.
आज झालेल्या सामन्यात आशियाई किंग्ज श्रीलंकेने यजमान झिम्बाब्वेचा पराभव करून विश्वचषकात स्थान मिळवले. दोन जागांसाठी १० संघ रिंगणात होते. खरं तर दोन वेळचा जगज्जेता वेस्ट इंडिजचा संघ इतिहासात प्रथमच वन डे विश्वचषकात नसणार आहे. आगामी वन डे विश्वचषक भारतात होत असून स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ५ ऑक्टोबरपासून या बहुचर्चित स्पर्धेला प्रारंभ होणार आहे, तर १५ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असतील.
श्रीलंकेचा ९ गडी राखून विजय
आज झालेल्या विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. या विजयासह श्रीलंकेचा संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ३२.२ षटकांत सर्वबाद १६५ धावा केल्या. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या पथुम निसांकाने शानदार शतकी खेळी केली. त्याने १०२ चेंडूत १०१ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
विश्वचषकातील भारताचे सामने -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू