दुबई : पाकिस्तानविरूद्ध सामना खेळावा की नाही, या वादाकडे लक्ष न देता टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाने रविवारी झालेल्या टी-२० आशिया चषक स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला २० षटकांत ९ बाद १२७ धावांत रोखल्यानंतर भारतीयांनी १५.५. षटकांत ३ बाद १३१ धावा केल्या.
या शानदार विजयासह भारतीय संघाने अ गटात अव्वल स्थान अधिक भक्कम करत सुपर फोर फेरीतील आपले स्थानही निश्चित केले. भारतीय संघ आता शुक्रवारी आपला अखेरचा साखळी सामना ओमानविरूद्ध खेळेल.
अन् सूर्याने हात मिळविला नाही...
भारत-पाक सामन्याआधी निर्माण झालेल्या वातावरणाची कल्पना भारतीय खेळाडूंनाही होती. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने मॅचआधी टॉसवेळी जी परंपरा जपली जाते ती पाक विरुद्धच्या टॉसवेळी मोडत भारतीयांची भावना जपण्याचा प्रयत्न केला. टॉसवेळी सूर्यकुमार यादवने पाक कर्णधार याच्याशी हात मिळवला नाही. तो तसाच निघून गेला. सूर्यकुमारयाने टॉसआधीच टीम मॅनेजमेंटला पाकिस्तान कर्णधारासोबत परंपरेनुसार, हात मिळविणार नाही, हे स्पष्ट केले होते.
कुलदीपने पाकिस्तानला पाडले खिंडार
कुलदीप यादव, अक्षर पटेलची दमदार फिरकी भारताच्या विजयात मोलाची ठरली. कुलदीपने १८ धावांत ३ बळी घेत पाकच्या फलंदाजीला खिंडार पाडले. यानंतर भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला चढवताना भारताचा विजय सोपा केला.