अमोल मचाले ।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघाने कात टाकली आहे. प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करून टीम इंडियाने क्रिकेटविश्वातील मातब्बर संघ म्हणून नाव कमावले आहे. असे असले तरी, काही कच्चे दुवे अद्याप कायम आहेत. प्रतिस्पर्धी संघातील आघाडीचे आणि मध्यफळीतील फलंदाज झटपट माघारी धाडल्यानंतर तळातील फलंदाजांना लवकर बाद करण्यात अधूनमधून येणारे अपयश, ही समस्या त्यापैकी एक. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी हेच घडले. निम्मा संघ ५३ धावांवर, तर आठवा फलंदाज १६२ धावांवर बाद होऊनही आपल्या गोलंदाजांना शेपूट गुंडाळण्यात अपयश आल्याने पहिल्या डावात आफ्रिकेला पावणेतीनशेपर्यंत मजल मारता आली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसºया दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी, तर उरलेल्या दोन सत्रांत आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिस, तसेच तळातील फलंदाजांनी छाप पाडली. यजमान भारताने शुक्रवारी ५ बाद ६०१ धावांवर डाव घोषित केल्यानंतर आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३६ अशी वाईट केली होती. त्यानंतर शनिवारी दिवसभरात पाहुण्या संघाने ९०.१ षटकांत ७ फलंदाजांच्या मोबदल्यात २३९ धावांची भर घातली. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला केशव महाराज याने आफ्रिकेतर्फे सर्वाधिक ७२ धावांचे (१३२ चेंडूंत १२ चौकार) योगदान दिले. फिलॅँडरने त्याला मोलाची साथ देताना नाबाद ४४ धावा केल्या. पहिल्या डावात भारताला ३२६ धावांची आघाडी मिळाली. रविचंद्रन आश्विन याने चार, उमेश यादवने तीन, मोहम्मद शमीने दोन, तर रवींद्र जडेजाने एक बळी घेतला.