Join us

भारतीय चाहत्याने केली वर्णद्वेषी शेरेबाजी, इम्रान ताहीरचा आरोप

इम्रान ताहीर शनिवारच्या लढतीत खेळला नव्हता. दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले की, ज्यावेळी ताहिर १२ व्या खेळाडूची भूमिका बजावत होता त्यावेळी त्याच्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 18:26 IST

Open in App

पोर्ट एलिझाबेथ : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासोबत चौथ्या वन-डे लढतीदरम्यान एका भारतीय चाहत्याने माझ्यावर वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याचा आरोप दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरने केला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याची चौकशी सुरू केली आहे.ताहीर शनिवारच्या लढतीत खेळला नव्हता. दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले की, ज्यावेळी ताहीर १२ व्या खेळाडूची भूमिका बजावत होता त्यावेळी त्याच्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली.मुसाजी म्हणाले, ‘मला इम्रानच्या वक्तव्यावरून जे कळले की, या लढतीदरम्यान एका व्यक्तीने त्याच्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केली. त्यांनी ड्रेसिंग रुमपुढे असलेल्या सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती दिली. दोन कर्मचारी शेरेबाजी करणा-या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेले.’ मुसाजी पुढे म्हणाले, ‘इम्रानने सांगितल्यानुसार शेरेबाजी करणारा भारतीय चाहता होता.’वाँडरर्समध्ये खेळाडू ड्रेसिंग रुम व मैदानादरम्यान ये-जा करीत असताना ही घटना घडली. ब्रेकदरम्यान मी ये-जा करीत असताना हा चाहता माझ्यावर शेरेबाजी करीत होता, असे इम्रानने सीएसएला सांगितले. सीएसएने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याचे मुसाजी यांनी म्हटले.मुसाजी म्हणाले, ‘इम्रान तेथे गेले असता शाब्दिक वाद झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ताहिरला तेथून हटविण्यात आले. त्याला ड्रेसिंग रुममध्ये बोलविण्यात आले.’ मुसाजी पुढे म्हणाले, ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका इम्रान ताहीरवर कुठला दंड ठोठावणार नाही. कारण बोर्डाने त्याची तक्रार स्वीकारली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारची मारपीट झालेली नाही आणि या घटनेत कुठल्या बालकाचाही समावेश नव्हता, हे सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हीडीओवरून स्पष्ट होते.’

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८क्रिकेट