Join us  

सौरव गांगुली संतापाच्या भरात कोहलीला धाडणार होता नोटीस, पण...; धक्कादायक खुलासा!

गेल्या तीन-चार महिन्यांपासून विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत असताना दिसून आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 4:19 PM

Open in App

नवी दिल्ली-

गेल्या तीन-चार महिन्यांपासून विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत असताना दिसून आलं आहे. सर्वात आधी कोहलीनं ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद सोडून सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुनही दूर करण्यात आलं आणि आता भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुनही कोहली पायउतार झाला आहे. विराट कोहलीनं गेल्या काही महिन्यांत घेतलेल्या या धक्कादायक निर्णयानंतर आता त्याच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आला आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी विराट कोहलीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त विधानावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीचा  (Sourav Ganguly) पारा चांगलाच चढला होता. याचवेळी संतापाच्या भरात सौवर गांगुलीनं विराट कोहलीला त्यानं केलेल्या विधानावरुन कारणे दाखवा नोटीस देखील धाडण्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे. 

इंडिया अहेड न्यूजच्या वृत्तानुसार सौरव गांगुलीनं कारणे द्या नोटीस तयार केली होती आणि विराट कोहलीला पाठवण्याची तयारी देखील केली होती. बीसीसीआयच्या इतर सदस्यांशी देखील गांगुलीनं याबाबत चर्चा केली होती. विराट कोहलीनं द.आफ्रिका दौऱ्यावर रवाना हो्ण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या विधानांमुळे सौरव गांगुलीनं केलेल्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. ट्वेन्टी-२० संघाची कॅप्टन्सी सोडू नये असा सल्ला आपण कोहलीला दिला होता असं वक्तव्य सौरव गांगुलीनं केलं होतं. पण प्रत्यक्षात पत्रकार परिषदेवेळी कोहलीनं वेगळंच विधान करुन गांगुलीला खोटं ठरवलं होतं. मला कुणीही कर्णधारपद सोडण्यासाठी रोखलेलं नाही. उलट माझ्या निर्णयाचं स्वागत केलं गेलं, असं विधान कोहलीनं केलं आणि एकच गहजब उडाला होता. 

कोहलीच्या धक्कादायक विधानानंतर बीसीसीआयमध्ये वादळ निर्माण झालं होतं आणि बीसीसीआयकडून संपूर्ण प्रकरणावर चुप्पी साधण्यात आली होती. दरम्यान, एकदिवसीय मालिकेसाठीच्या संघाची घोषणा करताना निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनीही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सौरव गांगुलीच्याच विधानाला पाठिंबा दिला होता. कोहलीनं घेतलेल्या निर्णयावर त्याला पुन्हा एकदा विचार करण्याची संधी सर्वांनी दिली होती, असं चेतन शर्मा म्हणाले. 

गांगुलीला बोर्डाच्या सदस्यांनी रोखलंविराट कोहलीनं केलेल्या विधानामुळे सौरव गांगुलीचा पारा चांगलाच चढला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात याआधी असं कधीच घडलं नसेल असा निर्णय घेण्याच्या तयारीत गांगुली होता. पण बीसीसीआयच्या इतर सदस्यांनी गांगुलीला तसं करण्यापासून रोखलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. द.आफ्रिकेच्या दौऱ्यावर संघ रवाना होत असताना कर्णधाराला अशापद्धतीनं नोटिस जारी करणं योग्य ठरणार नाही असं मत बोर्डाच्या सदस्यांनी नोंदवलं होतं. बोर्डाच्या सदस्यांचं म्हणणं गांगुलीनंही ऐकलं आणि कोहलीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. 

दरम्यान, कसोटी मालिका संपल्यानंतर कोहलीनं स्वत:हून कसोटी कर्णधारपद देखील सोडलं. महत्त्वाची बाब अशी की याबाबतचा निर्णय घेण्याआधी किंवा घेतल्यानंतर गांगुलीसोबत कोणतीही चर्चा केली नाही. विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपद सोडताना सर्वातआधी संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कल्पना दिली. त्यानंतर सर्व खेळाडूंना याबाबतची माहिती दिली आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना फोनकरुन निर्णय कळवला होता. 

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयविराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App