Join us
Daily Top 2Weekly Top 5

BCCI च्या अध्यक्षपदी विराजमान होणारा गांगुली दुसरा कर्णधार; 65 वर्षानंतर मिळाला मान

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईतील मुख्यालयात दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 14:31 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईतील मुख्यालयात दाखल झाला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पूर्णवेळ बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषविणारा गांगुली हा दुसरा कर्णधार ठरणार आहे. 65 वर्षांपूर्वी हा मान भारतीय संघाच्या कर्णधाराला मिळाला होता.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर गांगुलीच्या नावाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपद मिळल्याचा आनंद व्यक्त करताना सूत्रे हाती घेताच एक प्रमुख काम करणार असल्याचे गांगुलीनं सोमवारी स्पष्ट केले. बीसीसीआयची सध्याची प्रतीमा ही तितकीशी चांगील नाही, त्यामुळे सर्वप्रथम ती सुधारण्याचं काम करणार असल्याचे गांगुलीनं सांगितले. तो म्हणाला,''देशासाठी खेळलो आणि नेतृत्वही केलं, त्यामुळे ही नवीन जबाबदारी स्वीकारताना आनंद होत आहे. पण, मागील तीन वर्षांत बीसीसीआयची अवस्था बिकट झालेली आहे आणि अशा परिस्थितीत माझ्याकडे अध्यक्षपद आले आहे. बीसीसीआयच्या प्रतिमेला तडा गेलेला आहे आणि ती सुधारण्याची संधी मला मिळाली आहे.''

47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. तो म्हणाला,''प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याचे पहिले लक्ष्य असेल. त्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मी गेली तीन वर्ष प्रशासकिय समितीकडे याबाबत मागणी करत आहे, परंतु त्यांच्याकडून काणाडोळा केला गेला. त्यामुळे आता तो मुद्दा निकाली लावण्याचे पहिले ध्येय आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंचा आर्थिक प्रश्न सोडवायचा आहे.'' 

गांगुलीनं भारताचे माजी कर्णधार महाराजकुमार ऑफ विजयानगरम यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. महाराजकुमार यांनी 1936साली तीन कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर 1954 ते 1956 या कालावधीत त्यांनी बीसीसीआयचे पूर्णवेळ अध्यक्षपद भूषविले होते. माजी कर्णधार सुनील गावस्कर 2014मध्ये अध्यक्षपदी होते, परंतु ते हंगामी अध्यक्ष होते. 

गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. त्यानं 2000 ते 2005 या कालावधीत सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. 

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयसुनील गावसकर