इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याआधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोघांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही जोडगोळी फक्त वनडेत खेळताना दिसेल. दोघांचे ध्येय २०२७ मध्ये रंगणारी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याचे असेल, अशीही चर्चा रंगत आहे. दरम्यान सुनील गावसकर यांच्यानंतर आता सौरव गांगुलीनं या दोघांना आगामी वनडे वर्ल्ड कप संघात स्थान मिळवणं सोपं नसेल, असे म्हटले आहे. दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने धमक दाखवून दिल्याची चर्चा रंगत असताना सौरव गांगुलीनं दोन दिग्गजांसंदर्भात केलेली भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं मुश्किल, नेमकं काय म्हणाला गांगुली?
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं पीटीआयशी संवाद साधताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. गांगुली रोहित-कोहलीसंदर्भात म्हणाला आहे की, आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, प्रत्येक खेळाडूप्रमाणे एक दिवस हा खेळ त्यांच्यापासून आणि ते या खेळापासून दूर जातील. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ २७ वनडे सामने खेळणार आहे. वर्षाला फक्त १५ वनडे सामने खेळून टीम इंडियात जागा निश्चित करणं त्यांच्यासाठी खूपच कठीण टास्क आहे. दोघांनाही यासंदर्भात काही सल्ला देण्याची गरज नाही, असे म्हणत गांगुलीनं या जोडीसाठी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळवणं अवघड असल्याचे म्हटले आहे.
कोहलीच्या कसोटीतील निवृत्तीवरही केलं भाष्य
यावेळी सौरव गांगुलीनं विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीसंदर्भातही भाष्य केले. कोहलीचा निर्णय आश्चर्यचकित वाटला नाही. टीम इंडियासाठी ही गोष्ट चिंतेची बाबही वाटत नाही. पण त्याची रिप्लेसमेंट शोधणं हे एक मोठं आव्हान आहे, असे गांगुलीनं म्हटले आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की, ही जोडी थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच मैदानात उतरणार तेही पाहण्याजोगे असेल.