नवी दिल्ली : ‘बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली सध्याच्या निवड समितीमध्ये बदल करतील आणि दिग्गजांना स्थान देतील,’ अशी आशा असल्याचे भारताचा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केली आहे. हरभजन अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी न देताही त्याला भारताच्या टी२० संघातून वगळण्यात आल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देत होता.
हरभजनने टिष्ट्वट केले की, ‘मला वाटते की ते त्याच्या संयमाची परीक्षा बघत आहेत. निवड समितीमध्ये बदल होणे आवश्यक आहे. येथे अनुभवी लोकांची गरज आहे. दादा आवश्यक ते करतील, अशी आशा आहे.’ हरभजनने तिरुवनंतपुरमचे लोकसभा सदस्य काँग्रेसचे शशी थरुर यांच्या टिष्ट्वटचा हवाला दिला आहे. थरुर यांनी २५ वर्षीय केरळचा खेळाडू सॅमसनला संधी न दिल्यामुळे निराशा व्यक्त केली.
हरभजन म्हणाला, ‘संधी न देता सॅमसनला वगळल्यामुळे निराश झालो. तीन टी२० सामन्यांत तो पाणी घेऊन गेला. त्यानंतर त्याला वगळण्यात आले. ते त्याच्या फलंदाजीची परीक्षा घेत आहेत की संयमाची?’ सॅमसनने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी राष्ट्रीय टी२० अजिंक्यपदमध्ये केरळतर्फे चार सामन्यांत ११२ धावा केल्या. तो आपला एकमेव टी२० आंतरराष्ट्रीय सामना २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता.