Sourav Ganguly, Champions Trophy 2025 : भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत आहेत. यातील सात संघांची घोषणा करण्यात आली आहे. यजमान देश पाकिस्तानचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. पण भारताच्या संघात मात्र अपेक्षेप्रमाणे काही बडे तर काही युवा चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात शुबमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तसेच विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसारखे बडे खेळाडू आहेत. या खेळाडूंपैकी दोघांबाबत सौरव गांगुलीने महत्त्वाचे विधान केले आहे.
"विराट कोहली हा मिताली राज किंवा झुलन गोस्वामी यांच्यासारखा लाखात एक क्रिकेटर आहे. तो वन-डे, टी२० क्रिकेटमधील जगातला सर्वोत्तम क्रिकेटर आहे. पर्थच्या मैदानावर शतक ठोकल्यानंतर तो ज्यापद्धतीने खेळला त्याने मी अचंबित झालो. मला वाटलं होतं की तो त्यानंतर दमदार कामगिरी करून अख्खी सिरिज गाजवेल, पण तसं झालं नाही. प्रत्येक खेळाडूची बलस्थाने आणि उणीवा असतात. पण तुम्ही तुमच्या उणीवांवर कशी मात करता, हेच खरे कसब असते. विराट अजूनही छान खेळू शकतो. इंग्लंड विरूद्धची कसोटी मालिका त्याच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्याच्या फॉर्मबद्दल मला अजिबात चिंता नाही. तो वनडे मधला सर्वोत्तम क्रिकेटर आहे. त्यामुळे तो नक्कीच भरपूर धावा करेल," असे गांगुली म्हणाला.
"रोहित शर्मादेखील वनडे क्रिकेटमधील अप्रतिम प्रतिभा असलेला खेळाडू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु झाल्यानंतर तुम्हाला वेगळाच रोहित शर्मा दिसेल जो खूपच दमदार कामगिरी करेल. याशिवाय मोहम्मद शमी देखील संघात परतला आहे. जसप्रीत बुमराहनंतर शमी हाच आपल्या संघातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. मला त्याला पुन्हा कसोटी क्रिकेट खेळतानाही पाहायचं आहे. एकाच सामन्यात शमी आणि बुमराह दोन्ही बाजूने गोलंदाज करत असल्याचा नजारा मला पुन्हा अनुभवायचा आहे," असेही तो म्हणाले.
Web Title: Sourav Ganguly gives special compliment to Virat Kohli Rohit Sharma ahead of Champions Trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.