Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आयपीएलच्या कामगिरीवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका'

कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना बंगळुरूला यंदा 13 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 11:36 IST

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातून प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. मंगळवारी पावसामुळे बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रद्द झाला आणि त्याचबरोबर विराट कोहलीच्या प्ले ऑफमध्ये खेळणाच्या अखेरच्या आशाही विरून गेल्या. आयपीएलमधील या अपयशामुळे कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हाच कोहली वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला विजय मिळवून देईल का, असाही सवाल केला जात आहे. पण, आयपीएलमधील कामगिरीवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.

कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना बंगळुरूला यंदा 13 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले. त्यांचा 8 सामन्यांत पराभव झाला, तर एक सामना रद्द झाला. काही सामन्यांत बंगळुरूला हातात आलेला विजयाचा घास गमवावा लागला. कोहलीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका संघाला अनेकदा बसला. त्यामुळेच वर्ल्ड कपमध्ये कोहलीकडून अशा चुका होऊ नयेत, अशी प्रार्थना क्रिकेटचाहते करत आहेत. गांगुली म्हणाला,''ट्वेंटी-20 क्रिकेटमधील नेतृत्वावरून कोहलीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करू नका. भारताचा कर्णधार म्हणून त्याची कामगिरी अविश्वसनीय झालेली आहे. ''

आयपीएलमधील अपयशाचा फटका कोहलीच्या कामगिरीवरही जाणवेल, अशी अनेकांना भीती आहे. पण, गांगुलीला तसे वाटत नाही. ''भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघात अनेक मॅच वीनर खेळाडू आहेत आणि संघ संतुलित आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात सर्व खेळाडू शंभर टक्के योगदान देण्यासाठी प्रयत्नशील असतील.''

इंग्लंड आणि वेल्स येते 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. 12 मे ला आयपीएलची अंतिम लढत होईल आणि त्यानंतर भारतीय संघालीत खेळाडूंना विश्रांतीसाठी 21 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 

भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

भारताचे सामने ( वेळ दुपारी 3 वाजता) बुधवार 5 जून 2019 : द. आफ्रिकारविवार 9 जून 2019 : ऑस्ट्रेलियागुरुवार 13 जून 2019 : न्यूझीलंडरविवार 16 जून 2019 : पाकिस्तानशनिवार 22 जून 2019 : अफगाणिस्तानगुरुवार 27 जून 2019 : वेस्ट इंडिजरविवार 30 जून 2019: इंग्लंड मंगळवार 2 जुलै 2019 : बांगलादेश शनिवार 6 जुलै 2019: श्रीलंका

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९आयपीएल 2019सौरभ गांगुलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली