मुंबई : तुमच्यामध्ये जर गुणवत्ता आणि अथक मेहनत घेण्याची तयारी असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने हीच गोष्ट सिद्ध केली आहे. भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळवत अथर्वने सर्वांचेच लक्ष वेधताना प्रतिकूल परिस्थितीतूनही यश मिळवण्यासाठी सर्वांना नवा विश्वास दिला. श्रीलंकेत ५ सप्टेंबरपासून १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होईल.
डावखुरा फिरकीपटू असलेल्या अथर्वचे वडील विनोद अंकोलेकर बेस्टमध्ये कंडक्टर होते. २०१० साली अथर्वच्या वडिलांचे निधन झाले, पण अथर्वने हार मानली नाही आणि आता त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले आहे. वडिलांच्या निधनानंतर अथर्वला क्रिकेटसाठी आई वैदही अंकोलेकर यांनी प्रोत्साहन दिले. वैदही सध्या मरोळ बेस्ट आगारामध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. अथर्व फक्त क्रिकेट खेळत नसून त्याचे शिक्षणही सुरू आहे. मुंबईतील रिझवी महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. ‘अथर्वची जेव्हा भारतीय संघात निवड झाली, तेव्हा मला बरेच शुभेच्छांचे मेसेज आले. माझे पती विनोद हे बेस्टमध्ये कंडक्टर होते. त्यांचे निधन झाले आणि आमच्यावर मोठे संकट कोसळले. आमच्या घरामध्ये ते एकटेच कमावते होते. सुरुवातीच्या काही काळात मी मुलांच्या शिकवण्या घेतल्या. पण कालांतराने मला पतींच्या जागी बेस्टमध्ये नोकरी देण्यात आली,’ असे अथर्वच्या आई वैदेही यांनी सांगितले.