भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धा आठवड्याभरासाठी स्थगित करण्यात आली होती. स्पर्धेतील उर्वरित सामने पुन्हा खेळवण्यासाठी बीसीसीआयने नवे वेळापत्रक सहभागी १० फ्रँचायझी संघांना पाठवले असून लवकरच ही स्पर्धा पुन्हा सुरु होईल, अशी अपेक्षा आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यावर बीसीसीआय अधिकृतरित्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करणार असल्याचेही बोलले जाते. एका बाजूला IPL स्पर्धा पुन्हा सुरु करण्याची तयारी सुरु असताना दुसऱ्या बाजूला मिचेल स्टार्कसह अन्य काही स्टार परदेशी खेळाडू पुन्हा आपल्या फ्रँचायझी संघाला जॉईन होणार नाहीत, अशी चर्चा रंगू लागली आहे. इथं जाणून घेऊयात या यादीत कोणते खेळाडू आहेत अन् ते पुन्हा स्पर्धेत सहभागी न होण्यामागचं कारण काय? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!स्टार्कसह अनेक खेळाडू उर्वरित आयपीएल स्पर्धेला मुकण्याची शक्यता
आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बहुतांश परदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्याला पसंती दिलीये. १६ किंवा १७ मे पासून स्पर्धा पुन्हा सुरु करण्यासाठी बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना आपल्या खेळाडूंना एकत्रित करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. पण मायदेशी परतलेले काही परदेशी खेळाडू पुन्हा या स्पर्धेसाठी भारतात परतणार नसल्याची चर्चा आहे. यामागचं कारण हे आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धाही आहे.
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO ! ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा आपल्या खेळाडूंना पाठिंबा
पुन्हा स्पर्धेसाठी भारतात न परतणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड या ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजांची नावे सर्वात आघाडीवर आहेत. हेजलवूड हा दुखापतीमुळे पुन्हा आरसीबीच्या संघात सामील होणे मुश्किल असल्याचे बोलले जाते. स्टार्कही उर्वरित आयपीएल सामन्यासाठी परतणार नसल्याची माहिती त्याच्या मॅनेजरनं दिली होती. या मुद्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना पाठिंबा दिला असून पुन्हा परत जायचं की, नाही हा खेळाडूचा वैयक्तिक प्रश्न असून सध्याच्या परिस्थितीचा विचार करून बीसीसीआय नवा नियम खेळाडूंवर लादणार नाही, अशी आशा व्यक्त केलीये. IPL स्पर्धेतून माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंसाठी बीसीसीआयने आयपीएलमध्ये दोन वर्षांची बंदीचा नियम लागू केला आहे.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलही आहे यामागचं कारण
मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, जोश इंग्लिस आणि पॅट कमिंन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील ट्रिस्टन स्टब्स, मार्को यान्सेन, कगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी ही मंडळी ११ जून पासून लॉर्ड्सवर रंगणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलसाठी संघाचा भाग असू शकतात. त्यामुळे या खेळाडूंच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अद्याप कोणत्याही खेळाडूनं अधिकृतरित्या स्पर्धेतून माघार घेतलेली नाही.