आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाच्या सलामी जोडीने मोठी कामगिरी केली. विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना आणि प्रतीका रावल या जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. मानधना आणि रावल यांनी आक्रमक खेळी करत पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची अभूतपूर्व भागीदारी रचली. या भागीदारीसह मानधना आणि रावल यांनी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५० पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी करणारी ही पहिली जोडी ठरली आहे.यापूर्वी, एकदिवसीय विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सलामी भागीदारीचा विक्रम इंग्लंडच्या बेकवेल आणि थॉमस यांच्या नावावर होता, ज्यांनी पहिल्या महिला एकदिवसीय विश्वचषकात केवळ १०६ धावांची भागीदारी केली होती. मानधना-रावल जोडीने तो ५२ वर्षांचा जुना विक्रम मोडला.
मानधना आणि प्रतीका यांची ही एकदिवसीय सामन्यांतील सहावी शतकी भागीदारी आहे. यासह, त्या अनुभवी फलंदाज मिताली राज आणि पूनम राऊत यांच्या सात शतकी भागीदारीच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. गेल्या तीन सामन्यांमध्ये फलंदाजीत अपेक्षित कामगिरी करू न शकलेल्या या दोन्ही सलामीवीरांनी या सामन्यात शतके झळकावण्याची संधी निर्माण केली होती, मात्र त्या थोडक्यात हुकल्या. स्मृती मानधना ६६ चेंडूंत ८० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली आणि प्रतीका रावल ९६ चेंडूंत ७५ धावा करून बाद झाली. या दोघींच्या विक्रमी भागिदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे लक्ष्य ठेवले.