श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या तिरंगी एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान संघाचा ९ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने ४६ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या कामगिरीसह स्मृती मानधनाने खास विक्रमाला गवसणी घातली. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिने स्थान मिळवले.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये ८००० पूर्ण केल्या. स्मृती मानधनाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ८ हजार १३ धावा केल्या. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत स्मृती मानधना पाचव्या स्थानावर आहे. तर, ऑस्ट्रेलियाची माजी अनुभवी मेग लॅनिंग सहाव्या स्थानावर घसरली. लॅनिंगच्या नावावर ८ हजार ७ धावा आहेत.
मानधनाने २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मानधना आता भारताची आघाडीची फलंदाज आहे. जगातील स्फोटक खेळाडूंमध्ये तिची गणना केली जाते. मानधनाने तिच्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत ९८ सामने खेळले आहेत. या काळात तिने ४६.२१ च्या सरासरीने ४ हजार २५३ धावा केल्या आहेत, ज्यात १० शतके आणि ३० अर्धशतके आहेत. तर, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मानधनाने १४८ सामन्यांत ३० अर्धशतकांच्या मदतीने ३ हजार ७६१ धावा केल्या.
भारताचा श्रीलंकेवर ९ विकेट्सने विजयभारत आणि श्रीलंका यांच्यात त्रिकोणीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना ३९ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाने ३८.१ षटकात १० विकेट्स गमावून १४७ धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. नल्लापुरेड्डी चरणी आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. अरुंधती रेड्डीने एक विकेट घेतली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने हे लक्ष्य फक्त २९.४ षटकांत पूर्ण केले.