भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार ओपनिंग बॅट्समन स्मृती मानधना हिने तिचे लग्न मोडल्यानंतर १० डिसेंबर रोजी पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली. संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी लग्न ठरले होते. परंतु, त्यांचे लग्न होण्यापूर्वीच मोडले. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट करून तिचे लग्न मोडल्याची माहिती दिली. तसेच तिच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना थांबवण्याचे आवाहन केले. याच पार्श्वभूमीवर स्मृती मानधनाने एका कार्यक्रमात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधना अमेझॉनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमात मानधनाने तिच्यासाठी क्रिकेट आणि टीम इंडियाची जर्सी घालणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले.
स्मृती मानधना काय म्हणाली?
"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते. टीम इंडियाची जर्सी घालणे ही नेहमीच माझी सर्वात मोठी गोष्ट आहे. मला लहानपणापासूनच फलंदाजीची आवड आहे आणि त्यासाठी माझी आवड समजून घेणे कोणालाही कठीण आहे. विश्वविजेता बनणे सोपे नाही, त्यासाठी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम आणि संघर्ष करावा लागतो. जेव्हा आम्ही विश्वविजेते झालो, तेव्हा ते माझ्यासाठी खरोखरच एक स्वप्न होते. २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकातून आम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. एक म्हणजे, तुम्ही प्रत्येक डावात शून्यापासून सुरुवात करता, जरी तुम्ही मागील डावात शतक केले असले तरीही. दुसरी म्हणजे, तुम्ही नेहमी स्वतःला नाही, तर संघाला प्राधान्य दिले पाहिजे.", असे ती म्हणाली.
आता श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार भारतीय संघ
महिला एकदिवसीय विश्वचषकानंतर बीसीसीआयने खेळाडूंना विश्रांती दिली. आता टीम इंडिया २१ डिसेंबरपासून श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या घरच्या टी-२० मालिकेत पुन्हा मैदानात उतरणार आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात स्मृती मानधनाचेही नाव असून, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शफाली वर्मा यांच्यासह अनेक स्टार खेळाडूही मैदानात दिसणार आहेत.