Smriti Mandhana And Palash Muchhal’s Haldi Ceremony : टीम इंडियाची क्वीन आणि महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि बॉलिवूड संगीतकार-फिल्ममेकर पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या विधींची सुरुवात हल्दी समारंभाने झाली. २३ नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. हळदी समारंभाने स्मृती-पलाश जोडीच्या लग्नातील कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमात स्मृती मानधनाच्या कुटुंबियांसह मित्र परिवारासह भारतीय महिला संघातील खेळाडूंनीही हजेरी लावली होती. स्मृतीसह टीम इंडियातील मिळून साऱ्याजणींनी हळदी समारंभात खास धम्माल केल्याचे पाहायला मिळाले. हळदी समारंभातील खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
स्मृती-पलाश जोडीची खास फ्रेम अन् एकमेकांवरील प्रेमाची खास झलक
हळदी समारंभातील कार्यक्रमातील जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यात स्मृती-पलाश जोडीचा एक खास व्हिडिओही पाहायला मिळतो. पिवळ्या रंगातील पारंपारिक पोशाखात ही जोडी हळदीच्या सोहळ्यात रंगल्याचे दिसते. एवढेच नाही तर दोघांच्या व्हायरल होणाऱ्या या फ्रेममध्ये एकमेकांवरील जीवापाड प्रेमाची खास झलकही पाहायला मिळते. स्मृतीने बॉर्डर असलेला पिवळा कुर्ता आणि शरारा सूटसह हळदीचा लूक परिपूर्ण करण्याला पसंती दिली आहे. पलाश मुच्छलही समारंभात पिवळ्या पारंपरिक कपड्यांमध्ये दिसला.
स्मृती-पलाश जोडीसोबत टीम इंडियातील मिळून साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
स्मृतीच्या हळदी समारंभाच्या सोहळ्यात शफाली वर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, रेणुका सिंह ठाकूर, राधा यादव, रिचा घोष आणि जेमिमा रॉड्रिग्ज या सर्व जणी ‘टीम दुल्हन’ म्हणून कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यांच्या उपस्थितीने हल्दी समारंभाची रंगत आणखी वाढली. महिला क्रिकेटपटूंनी या कार्यक्रमात धमाल-मस्ती करत मनसोक्त आनंद लुटला. स्मृतीसोबत स्टेजवर मिळून साऱ्याजणींनी झिंगाट डान्स केल्याचे पाहायला मिळाले. पलाशही त्यांच्यासोबत थिरकताना दिसून आले.