सिडनी : चेंडू छेडछाड प्रकरणात बंदीची शिक्षा भोगलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांचे विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले आहे. मात्र जोश हेझलवुड आणि पीटर हँड्सकोम्ब यांना संघात स्थान मिळवता आले नाही. केपटाऊनमध्ये गेल्या वर्षी मार्च मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडूशी छेडछाड प्रकरणात बंदीची शिक्षा भोगलेल्या वॉर्नर आणि स्मिथ यांनी पुनरागमन केले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी हे दोघेही खेळाडू उपलब्ध होते. मात्र निवडकर्त्यांनी त्यांना आयपीएल खेळून पुनरागमन करण्याचा सल्ला दिला. आयपीएलमध्ये दोघांनी चांगला खेळ केला आहे. आॅस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते ट्रेवर होन्स यांनी सांगितले की,‘ गेल्या सहा महिन्यात एकदिवसीय संघाच्या प्रदर्शनाने आम्ही खुश आहोत. आम्ही भारत आणि पाकिस्तानविरोधातील मालिका जिंकली आहे. स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांनी संघात पुनरागमन केले आहे. दोन्ही फलंदाज विश्वस्तरीय आहेत आणि आयपीएलमध्ये चांगला खेळ करत आहेत.’ त्यासोबतच जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलिया ए संघाची देखील निवड करण्यात आली.
>आॅस्ट्रेलिया विश्वचषक संघ : अॅरोन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नॅथन कुल्टर-नाईल, जेसन बेहरेनडॉर्फ, नॅथन लियोन, आणि अॅडम झम्पा.