Ayush Mhatre Breaks Rohit Sharma World Record : मुंबईचा युवा बॅटर आयुष म्हात्रे याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील विदर्भ संघाविरुद्धच्या लढतीत नाबाद शतकी खेळीसह मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मुंबईच्या संघासाठी मॅच विनिंग सेंच्युरी ठोकताना आयुष म्हात्रेनं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने हिटमॅन रोहित शर्माचा जवळपास १८ वर्षे अबाधित असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देशांतर्गत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारा युवा फलंदाज ठरला आयुष
मुंबईकडून खेळताना विदर्भ संघाविरुद्धच्या शतकी खेळीसह आयुष म्हात्रे हा देशांतर्गत क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात ( लिस्ट ए, फर्स्ट क्लास आणि टी २०) शतक झळकवणारा सर्वात युवा क्रिकेटर ठरला आहे. याआधी हा विक्रम रोहित शर्माच्या नावे होता.
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
हिटमॅन रोहितच्या विश्वविक्रमाला सुरुंग
लखनौच्या इकाना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात विदर्भ संघाने दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना आयुष म्हात्रेनं ४९ चेंडूत शतक साजरे केले. या सामन्यात त्याने ५३ चेंडूत ११० धावांची खेळी केली. त्याची ही खेळी तो ज्या हिटमॅनला आदर्श मानतो त्याच्या वर्ल्ड रेकॉर्डला सुरुंग लावणारी ठरली. रोहित शर्मानं १९ वर्षे आणि ३३९ दिवस वय असताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक झळकावले होते. आयुष म्हात्रेनं १८ वर्षे आणि १३५ वय असताना हा पराक्रम करून दाखवला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक झळकवणारे युवा बॅटर
- आयुष म्हात्रे- १८ वर्षे १३५ दिवस
- रोहित शर्मा -१९ वर्षे ३३९ दिवस
- उन्मुक्त चंद -२० वर्षे
- क्विंटन डी कॉक- २० वर्षे ६२ दिवस
- अहमद शहजाद - २० वर्षे ९७ दिवस