Join us

भारताविरुद्ध झालेली संथ गोलंदाजी म्हणजे बेजबाबदारपणा - लँगर

ऑस्ट्रेलिया संघाला संथ गतीने षटके टाकण्याचा दंड बसला नसता, तर ऑसी न्यूझीलंडऐवजी अंतिम फेरीत दाखल झाले असते. एसीएन रेडिओ नेटवर्कशी बोलताना लँगर यांनी संघावर राग व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 02:38 IST

Open in App

मेलबोर्न : भारताविरुद्ध मेलबोर्न कसोटीदरम्यान झालेली संथ गोलंदाजी हे  बेजबाबदारपणाचे प्रतीक असून यामुळे मोठी निराशा झाल्याची प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मंगळवारी दिली. या वृत्तीमुळेच ऑस्ट्रेलिया विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापासून वंचित राहिला, असे  म्हणाले. ऑस्ट्रेलियाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत निर्धारित वेळेत दोन षटके कमी टाकण्यासाठी चार डब्ल्यूटीसी गुणांचा फटका बसला. यानंतर भारताने इंग्लंडचा ३-१ ने पराभव करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. १८ ते २२ जून या कालावधीत भारत- न्यूृझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाईल.

ऑस्ट्रेलिया संघाला संथ गतीने षटके टाकण्याचा दंड बसला नसता, तर ऑसी न्यूझीलंडऐवजी अंतिम फेरीत दाखल झाले असते. एसीएन रेडिओ नेटवर्कशी बोलताना लँगर यांनी संघावर राग व्यक्त केला. ते म्हणाले,‘ आमचे व्यवस्थापक डोवे त्यावेळी संघासोबत नव्हते. ते कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी सुटीवर होते. सामन्यानंतर षटकांची गती मंद असल्याची आम्हाला जाणीव झाली. खरेतर तो आमचा बेजबाबदारपणा होता.’ न्यूझीलंड संघ डब्ल्यूटीसी गुणतालिकेत ०.३ टक्के गुणांनी पुढे आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोनामुळे दक्षिण आफ्रिका दौरा स्थगित केला. यामुळे देखील त्यांचा अंतिम फेरीचा मार्ग क्षीण झाला. 

 ‘ मला आठवते की सामन्यानंतर मी आणि कर्णधार टिम पेनने व्यवस्थापकांशी याविषयी संवाद साधला. यावर नाराजी देखील व्यक्त झाली. आम्ही डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळण्याची संधी गमावू शकतो, अशी माझ्या मनात शंका आली होती. ही दोन षटके आम्हाला डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यापासून वंचित ठेवू शकतात, असे मी खेळाडूंना बजावले होते.’ अशा गोष्टी सुधाराव्या लागतील. हे निराशादायी असले तरी यापासून धडा घेत आम्ही यानंतर अशा गोष्टींंवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू, याची मला खात्री आहे.’­ 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया