श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना गॅले स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पुन्हा कॅप्टन्सी मिळालेल्या स्टीव्ह स्मिथनं दमदार शतक झळकावले आहे. कसोटी कारकिर्दीतील ३६ वे शतक झळकावताना त्याने भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड आणि सध्याच्या जमान्यातील फॅब ४ मधील जो रुटच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या कसोटी शतकासह तो सर्वाधिक शतक झळकावण्याच्या यादीत आता टॉप ५ मध्ये पोहचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
द्रविडसह जो रुटची बरोबरी
कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या आघाडीच्या फंलदाजांमध्ये असेलल्या जो रुट आणि राहुल द्रविड यांच्या खात्यात प्रत्येकी ३६-३६ शतके आहेत. द्रविडनं निवृत्ती घेतली असून जो रुट आणि स्मिथमध्ये कडवी फाइट सुरु असल्याचे दिसून येते. ३६ व्या शतकासह स्मिथ या दोन स्टार क्रिकेटर्ससोबत संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहे.
सचिनच्या नावे आहे कसोटीत सर्वाधिक शतकांचा विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर्वाधिक ५१ शतकांसह सर्वात टॉपला आहे. त्यापाठोपाठ या यादीत दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचा नंबर लागतो. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४५ शतके झळकावली आहेत. रिकी पाँटिंग या यादीत ४१ शतकांसह तिसऱ्या स्थानावर असून श्रीलंकेचा संगकारा ३८ शतकांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. स्टीव्ह स्मिथ, जो रुट आणि राहुल द्रविड यांच्या खात्यात प्रत्येकी ३६-३६ शतकांची नोंद आहे.
कॅप्टन्सी मिळताच बॅटिंगमध्येही धमाकेदार शो जारी...
पॅट कमिन्सच्या दुखापतीमुळे श्रीलंका दौऱ्यावर स्मिथच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आलीये. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा कॅप्टन्सीचा ताज मिरवताना स्मिथच्या बॅटिंगमध्ये आणखी धमक दिसू लागलीये. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याच्या भात्यातून १४१ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. एवढेच नाही तर या सामन्यात त्याने कसोटीत १० हजार धावांचा टप्पा पार केला होता. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि क्रिकेट जगतातील तो १५ वा खेळाडू ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एका दमदार शतकासह त्याने लक्षवेधून घेतले आहे.
स्मिथची अॅलेक्स कॅरीसोबत द्विशतकी भागीदारी
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं ९१ धावांवर आघाडीच्या ३ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर स्मिथनं अॅलेक्स कॅरीच्या साथीनं श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी नोंदवली. अॅलेक्स कॅरीनंही शतकी डाव खेळला. गिलख्रिस्टनंतर आशियाई मैदानात शतक झळकवणारा तो ऑस्ट्रेलियाचा दुसरा विकेट किपर बॅटर ठरलाय.