Sri Lanka beat Australia - भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या मालिकेतील निर्णायक सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पण, दूर कोलंबोत क्रिकेट चाहत्यांना एका दर्जेदार सामना पाहायला मिळाला. श्रीलंकेने वन डे सामन्यात सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेले २९२ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने ६ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज पार केले. पथूम निसंका ( Pathum Nissanka) हा या विजयाचा नायक ठरला. २४ वर्षीय फलंदाजाने वन डेतील पहिले शतक झळकावताना अनेक विक्रम मोडले.
ऑस्ट्रेलियाने ६ बाद २९१ धावा केल्या. आरोन फिंच ( ६२), ट्रॅव्हीस हेड ( ७०*) आणि अॅलेक्स केरी ( ४९) यांनी चांगली फलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूंत ३३ धावा चोपल्या. लंकेच्या जेफ्री वंदेर्सेने ३ विकेट्स घेतल्या. पथूम निसंका ( १३७ ) व कुसल मेंडीस ( ८७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली १७० धावांची भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. पथूमने १४७ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, परंतु चरीथा असलंकाने खणखणीत षटकार खेचून श्रीलंकेचा विजय पक्का केला. श्रीलंकेने तिसरी वन डे मॅच ६ विकेट्स राखून जिंकून मालिका जीवंत राखली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पथुम हा पाचवा श्रीलंकन सलामीवीर ठरला. यापूर्वी सनथ जयसूर्या, मार्वन अटापट्टू, उपुल थरंगा व तिलकरत्ने दिलशान यांनी हा पराक्रम केला आहे. पथूमने १३७ धावांची खेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लंकन ओपनरची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. जयसूर्याने २००३ मध्ये १२२ धावा केल्या होत्या. २००३नंतर श्रीलंकेने प्रथमच ऑस्ट्रेलियाला सलग दोन सामन्यांत पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.