Dimuth Karunaratne Announce Retirement 100th Test : श्रीलंकेचा स्टार खेळाडू दिमुथ करुणारत्ने याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या गाले स्टेडियमवरील दुसरा कसोटी सामना या श्रीलंकन खेळाडूसाठी एकदम खास अन् अविस्मरणीय ठरेल. ६ ते १० फेब्रुवारी या कालावधीत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात मैदानात उतरताच शंभर कसोटी सामने खेळण्याचा खास रेकॉर्ड त्याच्या नावे होईल. या शतकासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा करेल. करुणारत्ने याने श्रीलंकेकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ हजारहून अधिक धावा केल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
निवृत्तीनंतर परदेशात सेटल होण्याचा प्लान
श्रीलंकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र 'डेली एफटी'च्या वृत्तानुसार, दिमुथ करुणारत्ने याने कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना खेळल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्ती झाल्यावर क्रिकेटर फॅमिलीसह ऑस्ट्रेलियात सेटल होणार असल्याचा उल्लेखही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. करुणारत्ने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची मॅच मेजर क्लब थ्री-डे स्पर्धेत खेळणार आहे. ही स्पर्धा १४ ते १६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.
निवृत्तीवर काय म्हणाला करुणारत्ने?
डेली एफटीच्या वृत्तानुसार, दिमुथ करुणारत्ने आपल्या निवृत्तीसंदर्भात म्हणाला की, एक खेळाडू वर्षातून फक्त चार कसोटी खेळत असेल तर फॉर्म कायम ठेवणं मुश्किल असते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून गेल्या दोन तीन वर्षात फारच कमी द्विपक्षीय मॅचेस खेळायला मिळाल्या. सध्याचा माझा फॉर्म पाहता शंभरावी कसोटी खेळून निवृत्त होणं हीच योग्य वेळ वाटते, असे या क्रिकेटरनं म्हटले आहे.
दिमुथ करुणारत्नेची कारकिर्द
दिमुथ करुणारत्ने याने २०११ मध्ये वनडे सामन्यातून आंतरारष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. आतापर्यंतच्या ९९ कसोटी सामन्यात त्याने १६ शतके आणि ३९ अर्धशतकांसह ७ हजार १७२ धावा केल्या आहेत. ५० वनडे सामन्यात त्याच्या खात्यात १ शतक आणि ११ अर्धशतकासह १ हजार ३१६ धावांची नोंद आहे. १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने श्रीलंकेकडून आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ हजारहून अधिक धावा केल्या आहेत.
Web Title: SL vs AUS Dimuth Karunaratne Announces Retirement From International Cricket After 100th Test Australia vs Sri Lanka 2nd Test Match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.