चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन संघाला धक्यावर धक्के बसताना दिसून येत आहे. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडलीये. मोठ्या स्पर्धेत थाटात एन्ट्री मारण्याऐवजी कांगारूंवर नको ती वेळ आलीये. जो संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रही ठरू शकलेला नाही त्या संघानं ऑस्ट्रेलियन संघाची अक्षरश: लायकी काढल्याचे दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लंकेच्या संघाचा डंका, वनडेत काढला कसोटीतील पराभवाचा वचपा
ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंका दौऱ्यावर कसोटीत निर्वाद यश मिळवले. दोन्ही कसोटी सामने त्यांनी ऐटीत जिंकले. पण दोन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्यांची पुंगी वाजली. श्रीलंकेनं कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवरील पहिला सामना जिंकून मालिकेत आधीच आघाडी घेतली होती. शुक्रवारी याच मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठ्या अंतराने पराभूत करत श्रीलंकेनं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघावर आशियात सर्वाधिक निच्चांकी धावसंख्येवर आटोपण्याची वेळ आलीये.
लंकेच्या ताफ्यातून एक शतक अन् दोन अर्धशतकं
कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना श्रीलंकेच्या संघानं निर्धारित ५० षटकात ४ बाद २८१ धावा केल्या होत्या. विकेट किपर बॅटर कुशल मेंडिस याने ११५ चेंडूचा सामना करताना ११ चौकाराच्या मदतीने १०१ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याच्याशिवाय निशान मदुष्का ५१ (७०) आणि कर्णधार असलंकानं ६६ चेंडूत ७८ धावांची खेळी करत अर्धशतक झळकावले. जनिथ लियांगेनंही अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २१ चेंडूत ३२ धावांची नाबाद खेळी केली.
कांगारुंच्या ताफ्यातील फक्त तिघांनाच गाठता आला दुहेरी आकडा, तोही फिफ्टीपर्यंत नाही पोहचला
श्रीलंकेच्या संघानं सेट केलेल्या २८२ धावा काढत मालिका एक एक बरोबरीत राखण्याची संधी ऑस्ट्रेलियाला होती. पण लंकेच्या गोलंदाजीसमोर कांगारुंच्या ताफ्यातील एकाचाही निभाव लागला नाही. ट्रॅविस हेड १८ (१८), कर्णधार स्टीव्ह स्मिथ २९ (३४) आणि जोश इंग्लिस २२ (२७) या तिघांनी दुहेरी आकडा गाठला. पण संघासाठी उपयुक्त ठरेल, अशी खेळी ते करू शकले नाहीत. अन्य खेळाडूंनीही नांगी टाकली अन् श्रीलंकेच्या संघानं २४.२ षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव १०७ धावांत आटोपला. श्रीलंकेच्या संघानं १७४ धावांनी विजय नोंदवत वनडे मालिका २-० अशी खिशात घातली. दुसरीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियावर आशियातील सर्वात खराब कामगिरीची नोंद झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. याचा अर्थ या स्पर्धेतील सर्व सामने आशियात रंगणार आहेत. त्याआधी ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेसाठी अपात्र ठरलेल्या संघाकडून लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
याआधी भारतीय संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियावर ओढावली होती नामुष्की
१९८५ नंतर आशियाई मैदानातील वनडेत ऑस्ट्रेलियाची अवस्था एवढी बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी शारजाच्या मैदानात भारतीय संघानं ४२.३ षटकात ऑस्ट्रेलियाचा खेळ १३९ धावांतच खल्लास केला होता. त्यानंतर आता श्रीलंकेनं १०७ धावांत त्यांना गुंडाळून दाखवलंय.