BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'

सूर्या फलंदाजीला येताच वाकडे-तिकडे शॉट खेळण्यास सुरुवात करतो. सूर्यकुमार यादव हा एक असा खेळाडू आहे की, जो कधीही सामना फिरवू शकतो.

By मुकेश चव्हाण | Published: May 14, 2023 01:51 PM2023-05-14T13:51:32+5:302023-05-14T14:38:53+5:30

whatsapp join usJoin us
SKY has no Limit! The Suryakumar Yadav who shots the ball in the air but has his feet on the ground Blog by Mukesh Chavan | BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'

BLOG: SKY has no Limit! चेंडू आकाशात भिरकावणारा, पण पाय जमिनीवर असलेला 'सूर्या'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सूर्यकुमार यादव म्हणजेच आपला सूर्या दादा...अरे सूर्या आहे ना...अरे सूर्याने काय शॉट मारला रे...अशी प्रतिक्रिया हल्ली नेहमीच ऐकायला मिळते. सूर्याने हेच तर कमावलं. सूर्याने खेळलेले शॉट्स क्रिकेटच्या इतिहासात यादगार बनून राहतील. कमी वेळेत क्रिकेट प्रेमींचा विश्वास मिळवण्यात सूर्यकुमार यादवला यश मिळाले. त्याने ते मेहनतीने आणि त्याच्या कामगिरीवर मिळवले. आज आयपीएलमध्ये गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचं पहिल्या चार संघात नाव दिसतंय, त्यामागे सूर्यकुमार यादवचा सिंहाचा वाटा आहे. मी तर सूर्या मुंबई इंडियन्स संघाचा 'पाठीचा कणा', आहे, अशीच उपमा देईल.

सूर्या फलंदाजीला येताच वाकडे-तिकडे शॉट खेळण्यास सुरुवात करतो. सूर्यकुमार यादव हा एक असा खेळाडू आहे की, जो कधीही सामना फिरवू शकतो. समोर गोलंदाजीसाठी फिरकीपटू असो किंवा वेगवान गोलंदाज, अचूक टप्प्यात चेंडू आला की चौकार नाहीतर षटकार लगावलाच समजा. तो एकदा सेट झाला की मैदानात सूर्या नावाचं वादळ आलं समजाचं. मग हे वादळ शमवणे भल्याभल्यांना मुश्किल होऊन जाते. सूर्या फलंदाजीसाठी आल्यास मैदानातील कोणताही कोपरा असो, तिकडे चेंडू पोहचतोच. सध्याची सूर्याची फलंदाजी पाहता पुढे तो नावाजलेल्या जगभरातील क्रिकेटपटूंचे विक्रम मोडीत काढणार हे नक्की. मात्र असं असताना देखील सूर्याचे पाय जमिनीवर आहे आणि तेच सध्या महत्वाचे आहे. 

सूर्यकुमार मुंबईतच लहानाचा मोठा झाला. त्यामुळे तो पक्का मुंबईकर आहे. वडापाव, पावभाजी आणि रस्त्याच्या बाजूला गाडीवर मिळणारं चायनीज विशेषत: ट्रिपल शेझवान राईस हे पदार्थ त्याला प्रचंड आवडतात. तसेच सूर्या मराठी भाषा देखील उत्तम बोलतो. अनेकवेळा तो मुलाखतीत मराठीत बोलताना दिसतो. सूर्यकुमार यादव इन्स्टाग्रामवर सातत्याने मुंबईतल्या सिद्धीविनायक गणपतीचा फोटो शेअर करतो. मुंबईत असला की सूर्यकुमार देवळात जाऊन बाप्पाचं दर्शनही घेतो. सूर्यकुमारच्या अंगावर असंख्य टॅटू आहेत. हे टॅटू अनोखे आहेत. एका हातावर सूर्यकुमारने आईबाबांचे चित्र गोंदवून घेतलं आहे. 

सूर्या सध्या ३२ वर्षांचा आहे. त्याचा फिटनेस भन्नाट असल्यामुळे त्याच्या शरीरावरुन तो ३२ वर्षांचा असेल, असं दिसून येत नाही. सूर्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी उशिरा मिळाली, असं मला तरी वाटतंय. कारण २४ ते २९ वर्षांच्या कालावधीत तो भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड आणि प्रचंड मेहनत करत होता. डोमेस्टिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट या स्थित्यंतरासाठी सूर्यकुमारने ११ वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षा केली. सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचा कणा झाला तरीही भारतीय संघाची दारं इतक्या सहजी त्याच्यासाठी खुली झाली नाहीत. आयपीएल मोसमात धावांचा डोंगर उभारणाऱ्या सूर्याला वेटिंगवर ठेवण्यात आलं. मात्र शेवटी मेहनतीचं फळ मिळालं. सूर्याने वयाच्या ३०व्या वर्षी मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध सामन्यात पदार्पण केलं. या सामन्यात त्याने २८ चेंडूत अर्धशतक झळकावून शानदार खेळी केली. सूर्यकुमार यादवला 'विस्डेन टी-ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून निवडण्यात आलं. 

२०२२ मध्ये सूर्यकुमारने एका वर्षात १००० टी२० धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. गेल्या वर्षभरात सूर्याने टी२० क्रिकेटमध्ये एक हजार १६४ धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळेच आयसीसीनं सूर्याला क्रिकेटर ऑफ द ईयर २०२२  हा पुरस्कार जाहीर केला होता. १८७ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने सूर्यानं वर्षभरात धावा जमवल्या आहेत. ३१ सामन्यात सूर्यानं ६८ षटकारांचा पाऊस पाडलाय. 

मधल्या काळात सूर्यकुमार यादवची तुलना दक्षिण अफ्रिकेचा महान फलंदाज MR. 360 एबी डिव्हिलियर्स याच्यासोबत झाली होती. मात्र एबीडी हा एकमेव मिस्टर 360 खेळाडू असल्याचं सांगत सूर्याने चाहत्यांची मनं जिंकली. विशेष म्हणजे स्वत: एबी डिव्हिलियर्सने देखील सूर्याची फलंदाजी पाहून प्रभावित झाल्याचे सांगितले. सूर्यकुमारची फलंदाजी शैली काहीशी माझ्या शैलीप्रमाणे आहे. तो माझ्यासारखा खेळतो. पण त्याला फक्त कामगिरीत सातत्य ठेवण्यावर भर द्यावा लागेल. पुढील पाच-दहा वर्षे त्याला हेच करावे लागणार आहे, असा सल्ला एबी डिव्हिलियर्सने सूर्यकुमारला दिला.

सूर्यकुमार यादवच्या नावाचा शॉर्ट फॉर्म SKY असा होतो. चेंडू आकाशात भिरकावण्याची त्याची स्टाईल या नावाला साजेशीच आहे. या जोरावरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उंच झेप घ्यावी आणि नावातील 'सूर्या'प्रमाणे त्याची बॅट तळपत राहावी, अशीच सर्व चाहत्यांची इच्छा आहे. 

सूर्यकुमार यादवची आतापर्यंतची कारकीर्द-

१. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी-

४८ सामने, १६७५ धावा, ४६.५२ सरासरी
३ शतकं, १३ अर्धशतक, १७५.७६ स्ट्राइक रेट 
१५० चौकार, ९६ षटकार 

२. आंतरराष्ट्रीय वन-डे-

२३ सामने, ४३३ धावा, २४.०५ सरासरी
२ अर्धशतकं, १०२.३६ स्ट्राइक रेट 
४५ चौकार, ८ षटकार 

३. आंतरराष्ट्रीय कसोटी-

१ सामना, ८ धावा, ८.०० सरासरी
१ चौकार

४. आयपीएल-

१३५ सामने, ३१२३ धावा, ३१.८७ सरासरी 
१ शतक, २० अर्धशतकं, १४२.९९ स्ट्राइक रेट 
३३६ चौकार, १०८ षटकार

Web Title: SKY has no Limit! The Suryakumar Yadav who shots the ball in the air but has his feet on the ground Blog by Mukesh Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.